आपला जिल्हा

बकरी ईद पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलीसांची शांतता समिती बैठक संपन्न

(फलटण /प्रतिनिधी ): दि.२८ मे २०२६ रोजी मुस्लिम बांवधवांचा बकरी ईद सण साजरा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता समितीची संयुक्त बैठक घेण्यात आली. ही बैठक दिनांक २५ मे २०२६ रोजी सकाळी ११.३५ ते १२.२५ या वेळेत फलटण शहर पोलीस ठाण्याच्या मीटिंग हॉलमध्ये पार पडली.

या बैठकीस मा. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, तहसीलदार अभिजीत जाधव तसेच पोलीस निरीक्षक अरविंद काळे उपस्थित होते. बैठकीत शांतता समिती सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, मोहल्ला कमिटी सदस्य, पत्रकार, गोरक्षक तसेच कत्तलखाना चालक मुस्लिम समाजातील नागरिक उपस्थित होते.

बैठकीदरम्यान उपस्थितांची मते जाणून घेत बकरी ईद निमित्त सुरू होणारे कत्तलखाने हे नगरपालिकेकडून तात्पुरता परवाना घेऊनच चालवावेत, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच गाय, वासरू किंवा खोंड यांची कत्तल कोणीही करणार नाही, याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून, अवैध कत्तल अथवा बेकायदेशीर प्रकार आढळल्यास संबंधित व्यक्ती किंवा टोळीवर नवीन शासन परिपत्रकानुसार मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी संबंधित कत्तलखाना चालकांना BNSS कलम १६८ अन्वये नोटिसा देखील बजावण्यात आल्या असून संपूर्ण परिस्थितीवर पोलीस प्रशासनाचे बारकाईने लक्ष असल्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!