आपला जिल्हा

ढवळ येथे प्रेमसंबंधाच्या वादातून अल्पवयीन युवकाचा खून; फलटण तालुक्यात खळबळ

(फलटण /प्रतिनिधी) – प्रेमसंबंधाच्या वादातून एका अल्पवयीन युवकाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना फलटण तालुक्यात उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.

मिऱ्याचीवाडी (ता. फलटण) येथील सोमनाथ संदीप जाधव (वय १७) असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी आदित्य विजय शिंदे, ओम लोखंडे, विठ्ठल लोखंडे, पिंटू लोखंडे (सर्व रा. ढवळ, ता. फलटण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आदित्य विजय शिंदे व नर्सिंह शिंदे यांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ हा एका मुलीशी मोबाईलवरून संपर्कात होता. या कारणावरून संबंधित मुलीच्या नातेवाईकांना राग होता. १० एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास सोमनाथला फोन करून ढवळ पाटी परिसरात बोलावण्यात आले.

यानंतर रात्री उशिरा सोमनाथच्या वडिलांना अज्ञात व्यक्तीने फोन करून, “तुमचा मुलगा धवक पाटी येथे आहे, तातडीने या,” असे सांगितले. वडील तेथे पोहोचल्यावर त्यांना मिऱ्याचीवाडी कमानीजवळ येण्यास सांगण्यात आले. तेथे लाल रंगाच्या कारमधून सोमनाथसह काहीजण उतरले.

त्या वेळी संबंधितांनी “तुमचा मुलगा आमच्या बहिणीशी चिटिंग करतो, त्याला जिवंत ठेवणार नाही,” असे म्हणत सोमनाथवर बेदम मारहाण केली. त्यानंतर आणखी दोघेजण मोटरसायकलवर येऊन सर्वांनी मिळून सोमनाथला लाथा-बुक्क्यांनी तसेच तोंड, छाती आणि पोटावर मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी सोमनाथ पळण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी त्याचा पाठलाग करून धवक पाटी येथील व्यापारी गाळ्यांच्या मागील पटांगणात तसेच मियाचीवाडी कमानीजवळ पुन्हा मारहाण केली.

गंभीर जखमी अवस्थेत सोमनाथला प्रथम फलटण येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी बारामती येथे हलवण्याचा सल्ला दिला. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्याला घरी नेण्यात आले. त्यानंतर त्याची प्रकृती खालावत गेल्याने पुन्हा फलटण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली असून अधिक तपास सुरू आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!