आपला जिल्हा
‘अनित्य, अनात्म व दुःख समजल्याशिवाय जीवन समजत नाही’ ; पूज्य भंते करुणानंद महाथेरो यांच्या धम्मदेशनाने समतानगर परिसर भारावला

(फलटण /प्रतिनिधी) : समता नगर, विडणी येथे कालकथित सुमनताई सचिन मोहिते यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित जाहीर धम्मदेसना कार्यक्रम अत्यंत श्रद्धामय आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. पूज्य भंते करुणानंद महाथेरो यांच्या प्रभावी धम्मदेशनाने संपूर्ण परिसर धम्ममय झाला.
कार्यक्रमादरम्यान भंते करुणानंद महाथेरो यांनी समतानगर येथील बुद्ध विहारास भेट देऊन महामानवांना अभिवादन केले. यावेळी बौद्ध उपासक-उपासिकांनी फुलांचा वर्षाव करत त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बौद्ध उपासक-उपासिका आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मोहिते परिवाराच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले तसेच भोजनदानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान बुद्ध, सद्धम्म आणि भिक्खू संघाला त्रिवार वंदन करून भंतेजींनी धम्मदेशनास सुरुवात केली. “तथागत बुद्धांनी संपूर्ण मानवजातीला दुःखमुक्तीचा मार्ग दिला असून बुद्धांचा धम्म हा मानवतेच्या कल्याणासाठी आहे,” असे त्यांनी सांगितले.
भंते करुणानंद महाथेरो यांनी बुद्धांच्या “अनित्य, अनात्म आणि दुःख” या त्रिसूत्री सिद्धांताचे अत्यंत सोप्या भाषेत विवेचन करत जीवनाचे वास्तव समजावून सांगितले. “जन्म झाला म्हणजे मृत्यू अटळ आहे. अहंकार, लोभ आणि द्वेष बाजूला ठेवून शील, सदाचार आणि माणुसकीचा मार्ग स्वीकारणे हेच खरे जीवन आहे,” असे ते म्हणाले.


