आपला जिल्हा

फलटणच्या रस्ते प्रश्नी प्रीतसिंह खानविलकरांचा लढा यशस्वी; इशाऱ्यानंतर प्रशासनाचे धाबे दणाणले

प्रशासकीय दिरंगाईविरुद्ध खानविलकरांचे रणशिंग | भ्रष्टाचाराचा संशय असलेल्या 'डबल निविदा' प्रकरणाचा केला भांडाफोड

(फलटण /प्रतिनिधी): फलटण शहरवासीयांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या रस्ते प्रश्नावर अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रीतसिंह खानविलकर यांनी दिलेल्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने मंगळवारी प्रभाग ८ मधील रखडलेल्या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. तहसीलदारांच्या आदेशानुसार झालेल्या या पाहणीमुळे भ्रष्ट साखळीचे धाबे दणाणले असून खानविलकर यांच्या जिद्दीचे शहरात कौतुक होत आहे.

प्रभागातील रस्त्यांची दुरवस्था आणि नागरिकांची होणारी ससेहोलपट थांबवण्यासाठी प्रीतसिंह खानविलकर गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाशी लढा देत होते. मात्र, नगरपरिषद प्रशासन आणि ठेकेदाराच्या संगनमतामुळे या कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते. अखेर खानविलकर यांनी २६ जानेवारी रोजी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा हलली. तहसीलदारांनी तातडीने दखल घेत नगरपरिषदेच्या अभियंत्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले.

या पाहणी दरम्यान नगरपरिषदेचे अभियंता श्री. गायकवाड आणि श्री. प्रतीक जाधव यांच्या उपस्थितीत खानविलकर यांनी प्रशासकीय ढिसाळ कारभाराचे वाभाडे काढले. गजानन चौक, जुने बोर्डिंग, ह. बा. कुलकर्णी घर ते रवी शिंदे गिरण रस्ता, जय हिंद कोल्ड्रिंक्स ते डॉ. जगताप दवाखाना यासह तब्बल ८ प्रमुख रस्त्यांची कामे वर्षानुवर्षे अपूर्ण असल्याचे पुराव्यासह सिद्ध झाले. या पाहणीमुळे कागदोपत्री प्रगती पथावर दाखवली जाणारी कामे प्रत्यक्षात कशी रखडली आहेत, हे स्पष्ट झाले.

सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे, ह. बा. कुलकर्णी ते रवी शिंदे गिरण या एकाच रस्त्यासाठी दोन वेगवेगळ्या नावांनी निविदा काढून ठेकेदाराला लाभ मिळवून देण्याचा प्रकार खानविलकर यांनी उघडकीस आणला. ज्या ठेकेदाराला तीन वेळा नोटीस देऊनही काम पूर्ण झाले नाही आणि ज्याला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश असतानाही प्रशासन पाठीशी घालत होते, त्या ठेकेदाराचे पितळ खानविलकर यांनी प्रशासनासमोर उघडे पाडले.

१५ ऑगस्ट २०२५ रोजी अमरसिंह भाऊसाहेब खानविलकर यांनी केलेल्या उपोषणावेळी दिलेल्या लेखी आश्वासनाची प्रशासनाला आठवण करून देत, प्रीतसिंह खानविलकर यांनी आता आरपारची लढाई पुकारली आहे. “केवळ पाहणी करून प्रशासन थांबणार असेल तर गाठ माझ्याशी आहे,” असा खणखणीत इशारा खानविलकर यांनी यावेळी दिला. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली होती.

प्रीतसिंह खानविलकर यांच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे फलटणमधील रखडलेल्या विकासकामांना आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!