(जावली /अजिंक्य आढाव )– आजच्या जागतिक परिस्थितीत साम्राज्यवाद आणि आर्थिक श्रेष्ठत्वाच्या स्पर्धेमुळे जगभरात अशांतता निर्माण झाली असून युद्धजन्य वातावरण तयार होत आहे. अशा वेळी मानवजातीसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे आज जगाला युद्धाची नव्हे, तर भगवान गौतम बुद्ध यांच्या अहिंसा, शील आणि प्रज्ञेच्या मार्गाची गरज आहे, असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पंढरीनाथ कदम यांनी केले.
मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे प्राचार्य शिवाजीराव भोसले प्राध्यापक प्रबोधिनी, शिक्षक कल्याण समिती व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आर्थिक श्रेष्ठत्व व जागतिक अशांतता” या विषयावरील विशेष सप्ताह कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रबंधक आर. वाय. गायकवाड होते.
प्रा. कदम पुढे म्हणाले की, आर्थिक श्रेष्ठत्ववादातून निर्माण झालेल्या साम्राज्यवादी भूमिकेमुळे जग अशांततेकडे वाटचाल करत आहे. अमेरिका, इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्षामुळे जागतिक मानवी जीवनावर परिणाम होत असून मूलभूत समस्या अधिक गंभीर होत आहेत. त्यामुळे युद्धाऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारून “युद्धापेक्षा बुद्ध” ही शांततेची भूमिका अंगीकारणे आवश्यक आहे.
अध्यक्षीय भाषणात आर. वाय. गायकवाड यांनी सांगितले की, आजच्या जगाला प्रेम, शांती आणि सलोख्याची अत्यंत गरज आहे. छोटे-मोठे वाद वैचारिक पातळीवर सोडवले, तरच मोठ्या संकटांपासून मानवजात सुरक्षित राहू शकते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तत्त्वज्ञान विभागप्रमुख प्रा. डॉ. नवनाथ रासकर यांनी केले. कार्यक्रमास विविध विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी डॉ. टी. पी. शिंदे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.