(जावली /अजिंक्य आढाव )जिल्हा परिषद सदस्या सौ. वैशाली संदीप कांबळे यांच्या विशेष प्रयत्नातून निंबळक (ता. फलटण) येथील ग्रामस्थांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळाला. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तसेच इतर कल्याणकारी मंडळांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना पेटी, बॅग, वॉटर फिल्टर आणि भांडी किटचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
या कार्यक्रमात बोलताना रायगडचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. मयूर गौंड यांनी शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. शासनाच्या अनेक योजना पात्र लाभार्थ्यांसाठी मोफत असून, ग्रामस्थांनी त्यांची माहिती घेऊन योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रायगडचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. मयूर गौंड, बरड गटाच्या जिल्हा परिषद सदस्या तथा सातारा जिल्हा परिषद समाजकल्याण समिती सदस्या सौ. वैशाली संदीप कांबळे, श्री संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मेघराज नाईक निंबाळकर, निंबळक ग्रामपंचायत सदस्या सौ. संगीता महेंद्र भोसले, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मदने, संजय यादव तसेच ग्रामविकास अधिकारी किशोर गौंड उपस्थित होते.
जिल्हा परिषद सदस्या सौ. वैशालीताई कांबळे यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचत असल्याने ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले.