कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा – गायत्री शेट्टी
(पुणे /प्रतिनिधी ): महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सहकारनगर, पुणे येथील कामगार कल्याण भवनात कामगार कल्याण केंद्राचा ८८ वा वर्धापन दिन रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास पुणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी राकेश माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारती हॉस्पिटल, पुणे येथील आरोग्य सेविका गायत्री शेट्टी होत्या. तसेच सामाजिक कार्यकर्ते उमेश बरदे, आतिश भोसले, गणेश भोसले, अमोल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना गायत्री शेट्टी यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजना, उपक्रम आणि कार्यक्रमांचा लाभ तळागाळातील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी घ्यावा, असे आवाहन केले. मंडळाचे कार्य अधिकाधिक कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक प्रचार व प्रसार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच ८८ व्या वर्धापन दिनानिमित्त मंडळाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केंद्रप्रमुख संदीप कांबळे यांनी केले. त्यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजना, उपक्रम व कार्यक्रमांची सविस्तर माहिती देत चालू आर्थिक वर्षात पुणे विभागातील जास्तीत जास्त कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रतिभा एरब यांनी केले. यावेळी कर्मचारी विकास पवार, रंजना भाटे यांच्यासह कामगार भवन, सहकारनगर येथील लाभार्थी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.