राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचा दुहेरी धमाका! मुलींकडून आंध्र प्रदेशचा १८ गुणांनी, तर मुलांकडून हिमाचल प्रदेशचा २० गुणांनी धुव्वा ; दोन्ही संघांची विजयी सलामी
(मुंबई /प्रतिनिधी ) : राष्ट्रीय खो-खोच्या मैदानावर महाराष्ट्राच्या मुला-मुलींनी एकाच दिवशी विजयाचा दुहेरी धमाका केला! पारुल विद्यापीठ, गुजरात येथे सुरू असलेल्या ४५ व्या ज्युनिअर राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी साखळी सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांना निष्प्रभ करत दिमाखदार विजय नोंदवले. मुलींच्या संघाने आंध्र प्रदेशचा ३०-१२ असा १८ गुणांनी, तर मुलांच्या संघाने हिमाचल प्रदेशचा ३८-१८ असा २० गुणांनी धुव्वा उडवला. विशेष म्हणजे, दोन्ही संघांनी एक डाव राखून विजय मिळवत राष्ट्रीय स्पर्धेतील आपली ताकद दाखवून दिली.
श्वेता नवलेची १० गुणांची आतषबाजी; मुलींचा आंध्र प्रदेशवर दणदणीत विजय..!
मुलींच्या अ गटातील सामन्यात महाराष्ट्राने आंध्र प्रदेशचा ३०-१२ असा एक डाव आणि १८ गुणांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षणाचा निर्णय घेतलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व गाजवले. आक्रमण आणि संरक्षण या दोन्ही आघाड्यांवर प्रभावी कामगिरी करत महाराष्ट्राने प्रतिस्पर्ध्याला वरचढ होण्याची संधीच दिली नाही. महाराष्ट्राच्या विजयात श्वेता नवलेने १ मिनिट ३० सेकंद नाबाद संरक्षणासह तब्बल १० गुणांची कमाई करत निर्णायक भूमिका बजावली. धनश्री कंकने ३ मिनिटे १० सेकंद संरक्षण आणि चार गुण, तर मैथिली पवारने ३ मिनिटे १० सेकंद संरक्षण व दोन गुण मिळवत विजयाला भक्कम आधार दिला. वेदिका तामखडेने २ मिनिटे २० सेकंद संरक्षण, स्नेहा लामकानेने चार गुण, तर नंदिनी सिसोदियाने दोन गुण मिळवत संघाच्या विजयात मोलाची भर घातली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी संरक्षणात तब्बल आठ बोनस गुण (ड्रीम रन) मिळवत आपली क्षमता सिद्ध केली. आंध्र प्रदेशकडून एम. डी. लक्ष्मी, एम. वाय. श्री, नेक्कलापुडी आणि ताडिथला प्रिया यांनी प्रत्येकी दोन गुण मिळवले; मात्र महाराष्ट्राच्या एकत्रित खेळापुढे त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.
ताबरेज खानचे १० गुण; मुलांकडून हिमाचल प्रदेशचा धुव्वा!
मुलांच्या ब गटातील सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने हिमाचल प्रदेशवर ३८-१८ असा एक डाव आणि २० गुणांनी दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आक्रमणात सातत्यपूर्ण गुणांची कमाई करत सामन्याची सूत्रे आपल्या हाती ठेवली. वैयक्तिक चमकदार कामगिरीसोबतच सांघिक समन्वयाच्या जोरावर महाराष्ट्राने एकतर्फी विजय साकारला. महाराष्ट्राकडून ताबरेज खानने सर्वाधिक १० गुण मिळवत आक्रमणात धडाका उडवला. हरदाय वसावेने २ मिनिटे ३० सेकंद संरक्षण आणि सहा गुण, तर जितेंद्र वसावेने २ मिनिटे ५० सेकंद व दोन मिनिटे संरक्षणासह चार गुण मिळवत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पार्थ देवकतेने दोन मिनिटे संरक्षण व दोन गुण, तर समर्थ चव्हाणने एक मिनिट संरक्षण करत संघाला मोलाची साथ दिली. हिमाचल प्रदेशकडून राजीव ठाकूर आणि अरक्षित शर्मा यांनी प्रत्येकी सहा गुण, तर नमन धिमानने दोन गुण मिळवले. मात्र महाराष्ट्राच्या आक्रमक खेळासमोर हिमाचल प्रदेशचा प्रतिकार टिकू शकला नाही.
मुलांचे गट : महाराष्ट्र ब गटात
मुलांच्या स्पर्धेत आठ गट करण्यात आले ते खाली प्रमाणे
गट अ : कर्नाटक, विदर्भ, हरियाना, आसाम, लडाख गट ब : महाराष्ट्र, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय गट क : कोल्हापूर, पंजाब, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, सिक्कीम गट ड : मध्य भारत, गुजरात, झारखंड, दादरा आणि नगर हवेली गट इ : केरळ, राजस्थान, तेलंगणा, त्रिपुरा गट फ : आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर गट ग : तमिळनाडू, दिल्ली, मध्य प्रदेश, चंदीगड गट ह : पश्चिम बंगाल, ओडिशा, पुद्दुचेरी, बिहार
मुलींचे गट : महाराष्ट्र अ गटात
मुलींच्या स्पर्धेतही आठ गटांची रचना करण्यात आली आहे.
गट अ : महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, दादरा आणि नगर हवेली, लडाख गट ब : ओडिशा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, आसाम, मेघालय गट क : पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य भारत, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम गट ड : कोल्हापूर, गुजरात, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर गट इ : तमिळनाडू, हरियाना, चंदीगड, त्रिपुरा गट फ : कर्नाटक, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, मणिपूर गट ग : विदर्भ, केरळ, गोवा, उत्तराखंड गट ह : तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड, बिहार
दोन्ही संघांच्या या दणदणीत विजयामुळे महाराष्ट्राच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, आगामी साखळी सामन्यांतही हीच विजयी लय कायम राखण्याचे आव्हान आता खेळाडूंसमोर असेल.