दुष्काळाचे संकट ओळखून तिरकवाडीतील बंद विहीर व आड दुरुस्त करा ! जिल्हा परिषद सदस्या वैशाली कांबळे यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन ; जलस्रोतांच्या पुनरुज्जीवनाची मागणी
( जावली /अजिंक्य आढाव ) आगामी काळातील संभाव्य दुष्काळ आणि पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता मौजे तिरकवाडी (ता. फलटण) येथील ओढ्यालगत असणारी बंद अवस्थेतील सार्वजनिक विहीर व आड यांची तातडीने स्वच्छता करून दुरुस्ती करावी, अशी मागणी बरड जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ. वैशाली संदीप कांबळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. अक्षय घावटे यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असून पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. तिरकवाडी येथील नागरिकांसह पशुधनालाही पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. गावातील ओढ्यालगत असणारी सार्वजनिक विहीर व आड हे ग्रामस्थांसाठी महत्त्वाचे जलस्रोत आहेत. मात्र, या विहिरी व आडामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा आणि झुडपे साचल्याने त्यातील पाणी वापरण्यायोग्य राहिलेले नाही.
आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असल्याने उपलब्ध जलस्रोतांचे वेळीच पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर विहीर व आडातील गाळ काढून त्यांची तातडीने स्वच्छता व दुरुस्ती करण्यात यावी. तसेच याबाबत संबंधित विभागाला योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी सौ. वैशाली संदीप कांबळे (जिल्हा परिषद सदस्या, बरड गट व सदस्य, जिल्हा समाजकल्याण समिती, सातारा), सामाजिक कार्यकर्ते श्री. अक्षय सोनवलकर, निरंजन पिसाळ, तुकाराम यादव, प्रकाश सूर्यवंशी, राहुल यादव, पांडुरंग यादव, विकास यादव, सतीश मदने, आकाश यादव, अर्जुन यादव, राजेंद्र मदने, गणेश यादव, रामभाऊ यादव आदी उपस्थित होते.