(फलटण /प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर ते श्रीक्षेत्र घुमाण (पंजाब) अशी सुमारे २,५०० किलोमीटरची भव्य सायकल वारी आयोजित करण्यात आली आहे. या वारीचा शुभारंभ शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विश्रामगृहात होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी सायकल वारी फलटण येथे मुक्कामी दाखल होणार आहे. या वारीमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील सुमारे १६० सायकल रायडर्स सहभागी होणार असल्याची माहिती भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पालखी सोहळा पत्रकार संघ, भागवत धर्म प्रसारक मंडळ, श्री नामदेव दरबार कमेटी श्रीक्षेत्र घुमाण (पंजाब), सायकल रायडर्स असोसिएशन आणि समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२२ पासून संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा या उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे.