२८ नोव्हेंबरपासून ६२ वी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा; राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यासाठी खेळाडूंची प्रतिष्ठेची लढत
अहिल्यानगर, ता. १४ (क्रीडा प्रतिनिधी) : वेग, चपळाई, कौशल्य आणि सांघिक समन्वयाचा थरार अनुभवण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात येणारी ६२ वी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा २०२६-२७ ही अहिल्यानगर येथे २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२६ या कालावधीत रंगणार आहे. या स्पर्धेतून आगामी ५९ व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ निवडले जाणार असल्याने राज्यातील नामवंत खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्यू आर्ट्स महाविद्यालयात स्पर्धेचा थरार
अहिल्यानगर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, लालटाकी रोड येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी ही माहिती दिली. राज्यातील विविध जिल्ह्यांतील पुरुष व महिला संघांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
२५ नोव्हेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत प्रवेशिका सादर करणे आवश्यक आहे. खेळाडूंची नोंदणी व प्रवेश अर्ज महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या www.mkka.org या अधिकृत संकेतस्थळावरील लॉग इन टॅबमधून ऑनलाइन पद्धतीने करणे बंधनकारक आहे. निर्धारित मुदतीत नोंदणी न केलेल्या खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
२७ नोव्हेंबरपर्यंत उपस्थिती अनिवार्य
सर्व सहभागी खेळाडूंनी २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत स्पर्धास्थळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित जिल्हा संघटना व संघांनी प्रवासाचे नियोजन करून वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रत्येक संघात १५ खेळाडूंसह १७ जणांचा समावेश
स्पर्धेतील प्रत्येक संघामध्ये एक प्रशिक्षक, एक व्यवस्थापक आणि १५ खेळाडू अशा एकूण १७ जणांना सहभागी होता येणार आहे. महिला संघासोबत महिला व्यवस्थापक असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
रेल्वेच्या महिला खेळाडूंनाही संधी
भारतीय महिला रेल्वे संघाच्या राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागाबाबत अद्याप निश्चितता नसल्याने महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने विशेष तरतूद केली आहे. भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या महिला खो-खो खेळाडूंना भारतीय रेल्वेचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करून राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे : डॉ. चंद्रजीत जाधव
राज्यातील अधिकाधिक खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी, या उद्देशाने सर्व जिल्हा खो-खो संघटना, पुरुष व महिला संघांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी केले आहे.
राज्य अजिंक्यपदाचा बहुमान आणि राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्याची संधी अशा दुहेरी उद्देशाने ही स्पर्धा रंगणार आहे. त्यामुळे अहिल्यानगरच्या मैदानावर महाराष्ट्रातील अव्वल खो-खोपटूंच्या कौशल्याचा आणि जिद्दीचा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.