(जावली/ अजिंक्य आढाव )फलटण तालुक्यातील पूर्व भागातील जावली, मिरढे, आंदरुड यासह परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई आणि चाऱ्याच्या कमतरतेमुळे शेतकरीवर्गासमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतीला पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने पिकांवर परिणाम होत असून, पशुधन जगविण्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीची तातडीने दखल घेऊन आवश्यकतेनुसार चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दुग्धव्यवसाय, शेळी-मेंढीपालन तसेच पशुपालन करतात. मात्र, पावसाचे कमी प्रमाण, पाण्याची टंचाई आणि हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाल्यास जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर होतो. जनावरांसाठी चारा खरेदी करणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने त्यांच्या अडचणी वाढत आहेत.
पशुधन वाचविण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात!
शेतकऱ्यांनी कष्टाने सांभाळलेली जनावरे ही त्यांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार आहेत. चारा व पाण्याअभावी पशुधन अडचणीत आल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने गावोगावी पाहणी करून चारा व पाण्याच्या उपलब्धतेचा आढावा घ्यावा. तसेच गरज असलेल्या गावांमध्ये चारा छावण्या सुरू करण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवावेत, अशी मागणी होत आहे.
केवळ आश्वासन नको, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा हवा!
दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने परिस्थितीचा आढावा घेऊन पशुधनासाठी चारा-पाण्याची व्यवस्था करावी. शासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकरी आणि पशुपालकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.