शिक्षण, संशोधन आणि सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल प्रा. डॉ. स्वप्नील शहा यांचा सन्मान वर्ल्डव्हिजन टाइम्सतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान ; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
(फलटण/ प्रतिनिधी): शिक्षण, संशोधन, विद्यार्थी मार्गदर्शन आणि सामाजिक बांधीलकीच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणारे एस. एन. जी. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, राजगुरुनगर, जि. पुणे येथील विभागप्रमुख प्रा. डॉ. स्वप्नील अनिल शहा यांना वर्ल्डव्हिजन टाइम्सतर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आ. बाबाजी रामचंद्र काळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नोबेल पुरस्कार नॉमिनेटर डॉ. सुधीर तारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वर्ल्डव्हिजन टाइम्सचे संपादक प्रा. नागेश सोपान हुलवळे यांच्या पुढाकाराने हा सन्मान सोहळा पार पडला.
मार्केटिंग मॅनेजमेंट विषयाचे मान्यताप्राप्त संशोधन मार्गदर्शक
प्रा. डॉ. स्वप्नील शहा हे मार्केटिंग मॅनेजमेंट आणि मानव संसाधन व्यवस्थापन या विषयांतील तज्ज्ञ प्राध्यापक आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. तसेच एम.बी.ए. (मार्केटिंग आणि एच.आर.एम.), बी.कॉम. आणि पी.जी.डी.एफ.टी. या शैक्षणिक पदव्या मिळविल्या असून, ते यूजीसी नेट परीक्षा उत्तीर्ण आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अभ्यासक्रमांतर्गत एम.बी.ए. विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचा त्यांना १५ वर्षांचा अनुभव आहे. विद्यापीठाचे मार्केटिंग मॅनेजमेंट विषयातील मान्यताप्राप्त पीएच.डी. संशोधन मार्गदर्शक म्हणूनही ते कार्यरत आहेत.
अध्यापनासोबतच संशोधन क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांचे संशोधन लेख स्कोपस आणि यूजीसी मान्यताप्राप्त नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. विविध संशोधन प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी पेटंट्स आणि कॉपीराइट्स प्राप्त केले असून, व्यवस्थापन क्षेत्रातील विविध विषयांवर पुस्तकेही लिहिली आहेत.
विद्यार्थ्यांना करिअरची दिशा देण्याचे कार्य
विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमाचे ज्ञान देण्यापुरते मर्यादित न राहता त्यांच्या सुप्त गुणांची, कौशल्यांची आणि क्षमतांची ओळख करून देत त्यांना योग्य करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन करणे, हे प्रा. डॉ. शहा यांच्या कार्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना व्यवस्थापन क्षेत्रातील आधुनिक संधींची माहिती देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास साधण्याबरोबरच त्यांना व्यावसायिक जीवनासाठी सक्षम बनविण्यावर त्यांचा भर असतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमतांची जाणीव होऊन करिअरची योग्य दिशा निवडण्यास मदत होत आहे.
सामाजिक बांधीलकीतून गरजूंना मदतीचा हात
शैक्षणिक कार्याबरोबरच प्रा. डॉ. स्वप्नील शहा सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेतात. गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, दप्तर आणि गणवेश यांचे वाटप करणे, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदतीचा हात देणे, अशा उपक्रमांतून ते सामाजिक बांधीलकी जपत आहेत.
शिक्षण, संशोधन, विद्यार्थी विकास आणि सामाजिक कार्य या क्षेत्रांचा समतोल साधत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करणारा आदर्श शिक्षक पुरस्कार हा त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाची दखल घेणारा सन्मान ठरला आहे.
प्रा. डॉ. स्वप्नील शहा यांच्या यशस्वी वाटचालीमागे त्यांच्या कुटुंबाचा संघर्ष, मेहनत आणि शिक्षणाविषयीची बांधिलकी यांचा मोठा वाटा आहे. पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या चासकमान पाटबंधारे प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या बिबी, ता. खेड येथील अनेक कुटुंबांपैकी स्वर्गीय मणिलाल मोतीचंद शहा (बिबीकर) यांचे कुटुंबही होते.
त्यांचे पुत्र अनिल मणिलाल शहा यांनी खेड (राजगुरुनगर) येथे स्थलांतरित झाल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘गिरीश फोटो स्टुडिओ’ आणि ‘श्यामली शॉपी अँड सप्लायर्स’ हे व्यवसाय सुरू केले. आई-वडील, पाच भाऊ आणि पाच बहिणी अशा मोठ्या कुटुंबाचा चरितार्थ सर्व बंधूंनी एकत्रितपणे मेहनत करून चालविला.
कुटुंबातील सदस्यांची विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती
कुटुंबातील सदस्यांनी आपापल्या क्षेत्रांत प्रगती साधत शैक्षणिक, व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रांत नावलौकिक मिळविला आहे. मोठे बंधू स्व. के. एम. शहा हे ‘लोकसत्ता’चे पुणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. पुण्यात स्थायिक झाल्यानंतर त्यांची मुले गिरीश आणि शिरीष यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला.
दुसरे बंधू रमेशभाई शहा यांचे पुत्र निलेश शहा यांनी आर्किटेक्चर क्षेत्रात पदवी संपादन करून पुणे शहरात नावलौकिक मिळविला. प्रकाशभाई शहा यांचे पुत्र सागर शहा यांनी विमा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, मोबाईल शॉपीच्या व्यवसायातही यश मिळविले आहे.
अनिल शहा यांचे पुत्र प्रा. डॉ. स्वप्नील शहा यांनी शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून, अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून घडविण्याचे कार्य केले आहे. सतीश शहा यांचे पुत्र साहिल शहा यांनी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करून बांधकाम व्यवसायात आपले स्थान निर्माण केले आहे.
डॉ. साधना शहा यांची वैद्यकीय क्षेत्रात भरारी
कुटुंबातील पाच बहिणींपैकी सर्वांत लहान असलेल्या डॉ. साधना शहा यांनीही शैक्षणिक गुणवत्तेत आघाडी घेत पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त केली. त्यांचा विवाह होमिओपॅथी क्षेत्रातील नावलौकिक प्राप्त डॉ. के. सी. शहा यांच्याशी झाला. त्यांचे पुत्र भाविन शहा हे संगणक क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून अमेरिकेत कार्यरत आहेत. प्रा. डॉ. के. सी. शहा यांचे नुकतेच निधन झाले.
स्वर्गीय मणिलाल मोतीचंद शहा यांच्या अन्य चार मुली राजगुरुनगर, फलटण, कराड आणि श्रीगोंदा येथे आपल्या कुटुंबांसह स्थायिक असून, त्यांची मुलेही विविध क्षेत्रांत प्रगती करीत आहेत.
शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाचा गौरव
प्रा. डॉ. स्वप्नील शहा यांच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनातील योगदान, विद्यार्थ्यांविषयीची तळमळ आणि सामाजिक बांधीलकी यांचा गौरव आदर्श शिक्षक पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि संशोधनात्मक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.