(फलटण/ प्रतिनिधी ): फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील संगणक व व्यवस्थापन विभागाच्या वतीने BCS व BCA च्या विद्यार्थ्यांसाठी ‘Cyber Security’ विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमाची उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे सैद्धांतिक ज्ञान तसेच प्रत्यक्ष अनुभव मिळावा, हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमासाठी श्री उत्पाल सामंत तसेच Macksofy Tech. Pvt. Ltd. चे , CEO श्री यासीर शेख हे Resource Persons म्हणून उपस्थित आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारी, ऑनलाइन फसवणूक, डिजिटल व्यवहारातील सुरक्षितता, सोशल मीडिया सुरक्षा, पासवर्ड सिक्युरिटी आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले Hands-on Training. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायबर धोके ओळखणे, डेटा संरक्षण, सुरक्षित ऑनलाइन व्यवहार, पासवर्ड सिक्युरिटी तसेच विविध सायबर हल्ल्यांपासून बचाव करण्याच्या उपाययोजनांचा अनुभव घेता येणार आहे. 30 तासांच्या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटीच्या विविध संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटी या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ. पी.एच कदम उपस्थित होते तसेच कार्यक्रमास संगणक व व्यवस्थापन विभागाचे विभाग प्रमुख प्रा एस एस लामकाने व सर्व शिक्षक वर्ग यांची विशेष उपस्थिती होती.
आधुनिक डिजिटल युगातील वाढत्या सायबर धोक्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर जागरूकता, सुरक्षित डिजिटल व्यवहार आणि जबाबदार डिजिटल नागरिकत्व विकसित करण्यासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थ्यांकडून या प्रशिक्षण कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.