मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला स्मार्ट डिजिटल बोर्डची साथ हिसोआ इलेक्ट्रॉनिक प्रा. लि. व उर्मी संस्थेचा स्तुत्य उपक्रम ; फलटणच्या मूकबधिर विद्यालयाला दोन डिजिटल बोर्डची भेट
(फलटण /प्रतिनिधी) : आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विशेष विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक सुलभ, प्रभावी आणि आनंददायी व्हावे, या उद्देशाने हिसोआ इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड आणि उर्मी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने फलटण येथील महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयाला दोन स्मार्ट डिजिटल बोर्ड भेट देण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मूकबधिर विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षण पद्धतीसोबतच आधुनिक डिजिटल माध्यमांचा वापर करून शिक्षण दिल्यास विविध विषय आणि संकल्पना अधिक सहजपणे समजावून सांगता येतात. डिजिटल बोर्डच्या माध्यमातून चित्रे, आकृत्या, व्हिडिओ, प्रेझेंटेशन तसेच विविध शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडता येणार असल्याने अध्यापन अधिक परिणामकारक होण्यास मदत होणार आहे.
यावेळी बोलताना महात्मा शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष दादासाहेब चोरमले म्हणाले, “स्मार्ट डिजिटल बोर्डच्या माध्यमातून मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणे अधिक सहज आणि सोपे होणार आहे. विशेष विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.”
ते पुढे म्हणाले, “समाजातील गरजू आणि दुर्लक्षित घटकांसाठी मदतीचा हात पुढे करणे ही खरी सामाजिक बांधिलकी आहे. हिसोआ इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड आणि उर्मी संस्थेने मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केलेली मदत महत्त्वपूर्ण असून, महात्मा शिक्षण संस्थेच्या वतीने दोन्ही संस्थांचे मनःपूर्वक आभार.”
यावेळी हिसोआ इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेडचे असिस्टंट मॅनेजर एचआर तथा सीएसआर लीड रोहित वाकळे यांनी संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित आणि गरजू घटकांपर्यंत मदत पोहोचविण्याच्या उद्देशाने संस्था विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
“ज्या ठिकाणी खरोखर मदतीची गरज आहे, त्या ठिकाणी मदत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असतो. फलटण येथील मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेले हे स्मार्ट डिजिटल बोर्ड त्यांच्या शिक्षणासाठी निश्चितच उपयुक्त ठरतील. भविष्यातही विशेष विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक ती भरीव मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल,” असे रोहित वाकळे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सौम्य बक्षी — एचआर मॅनेजर, शिवकांत चव्हाण — फायनान्स मॅनेजर, रोहित वाकळे — असिस्टंट मॅनेजर एचआर तथा सीएसआर लीड, उर्मी संस्था, वाकडेवाडी, शिवाजीनगर, पुणे येथील सचिव राहुल शिंदे, प्रकल्प व्यवस्थापक राहुल चुनिदासदास, संस्थेच्या सचिव सौ. वैशाली चोरमले, सौ. हेमा गोडसे, सौ. विजया भोजने, पवन राठोड, नितेश शिंदे, चैतन्य खरात, निर्मला चोरमले यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.
मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेली ही मदत केवळ दोन डिजिटल बोर्ड देण्यापुरती मर्यादित नसून, विशेष विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. तंत्रज्ञानाची साथ आणि समाजाची संवेदनशीलता यांचा संगम घडविणारा हा उपक्रम फलटणमध्ये कौतुकाचा विषय ठरला आहे.