साखळी व बाद फेरीत प्रतिस्पर्धी संघांवर सरळ सेटमध्ये विजय; खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक
(फलटण/प्रतिनिधी) :अण्णासाहेब डांगे महाविद्यालय, हातकणंगले येथे आयोजित शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविभागीय महिला व्हॉलीबॉल स्पर्धेत फलटण येथील मुधोजी महाविद्यालयाच्या महिला संघाने उत्कृष्ट कामगिरी करत चौथा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत संघाने साखळी व बाद फेरीत प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, सांघिक समन्वय आणि उत्कृष्ट खेळ यामुळे मुधोजी महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एका मानाचा तुरा रोवला गेला आहे.
स्पर्धेतील साखळी व बाद फेरीच्या सामन्यांमध्ये मुधोजी महाविद्यालयाच्या संघाने सांगली येथील मथुबाई गरवारे महाविद्यालय, कोल्हापूर येथील विवेकानंद कॉलेज तसेच भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयाच्या संघांवर सरळ सेटमध्ये विजय मिळवला. या दमदार कामगिरीच्या जोरावर संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
उपांत्य फेरीत मुधोजी महाविद्यालयाचा सामना यजमान अण्णासाहेब डांगे महाविद्यालय, हातकणंगले यांच्या संघाशी झाला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात मुधोजी महाविद्यालयाच्या संघाला २५-२१, १८-२५, १५-१० अशा गुणफरकाने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे संघाला स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेत मुधोजी महाविद्यालयाच्या नूतन अडसूळ, सुप्रिया निंबाळकर, संजीवनी जाधव, आयुशा जाधव, सानिया जाधव, प्रणाली मुळीक, ऋतिका चतुरे आणि समीक्षा साबळे या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. मैदानावरील त्यांचा उत्साह, जिद्द आणि सांघिक खेळाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, क्रीडा समितीचे चेअरमन श्री. शिवाजीराव घोरपडे, संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम तसेच मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी महिला संघाचे अभिनंदन केले.
खेळाडूंनी मिळवलेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेला नवी झळाळी मिळाली असून, भविष्यातही खेळाडूंनी अधिक मोठी यशशिखरे गाठावीत, अशा शुभेच्छा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दिल्या.