(जावली /अजिंक्य आढाव ):फलटण तालुक्यात पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विहिरी, कूपनलिका आणि जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी आणि पशुपालक मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर बरड गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. वैशाली संदीप कांबळे यांनी प्रशासनाकडे तातडीने चारा छावण्या सुरू करणे, पाण्याचे टँकर उपलब्ध करून देणे आणि दुष्काळ निवारणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. शेतकरी, पशुपालक संकटात; प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत.!
पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ग्रामीण भागात जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता कमी होत असल्याने पशुपालकांसमोर पशुधन जगविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. दुसरीकडे, पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सौ. वैशाली संदीप कांबळे यांनी डॉ. अभिजित जाधव, तहसीलदार, फलटण तसेच प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार तुषार देशमुख यांना निवेदन देऊन तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.
निवेदनातील प्रमुख मागण्या
१. प्रत्येक जिल्हा परिषद गटात चारा छावण्या सुरू करा.!
दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटात आवश्यकतेनुसार चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू करावेत. जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने नियोजन करावे.
२. टंचाईग्रस्त गावांना पाण्याचे टँकर उपलब्ध करा.!
पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असलेल्या गावांसह वाड्या-वस्त्यांमध्ये तातडीने पाण्याचे टँकर मंजूर करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा.
३. मनरेगाची कामे तातडीने सुरू करा..!
दुष्काळामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेल्या शेतकरी आणि शेतमजुरांना दिलासा देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) आवश्यक कामे तातडीने सुरू करावीत.
४. बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना सुरू करा!
ग्रामीण भागातील बंद किंवा अपुऱ्या निधीमुळे रखडलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेऊन आवश्यक निधी उपलब्ध करावा. या योजना तातडीने कार्यान्वित करून नागरिकांना दिलासा द्यावा.
‘शेतकरी आणि पशुपालकांना वाऱ्यावर सोडणार नाही!’
यावेळी बोलताना सौ. वैशाली संदीप कांबळे म्हणाल्या, “पावसाअभावी शेतकरी आणि पशुपालक हवालदिल झाले आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. प्रशासनाने कोणताही विलंब न करता चारा छावण्या सुरू कराव्यात आणि पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा. ग्रामीण भागातील जनता आणि शेतकऱ्यांना या संकटातून दिलासा मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.”
निवेदन देताना मान्यवर उपस्थित यावेळी तहसीलदार डॉ. अभिजित जाधव आणि प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार तुषार देशमुख यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सौ. वैशाली संदीप कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अक्षय सोनवलकर पाटील, अजय सुळ, निरंजन पिसाळ, सुहास भंडलकर, विशाल काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
आता प्रशासन या मागण्यांवर किती तत्परतेने कार्यवाही करते आणि दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकरी, पशुपालक व ग्रामस्थांना कधी दिलासा मिळतो, याकडे फलटण तालुक्याचे लक्ष लागले आहे