(जावली /अजिंक्य आढाव )मुंजवडी, ता. फलटण येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलाच्या दुरवस्थेबाबत गेल्या चार वर्षांपासून आवाज उठविणाऱ्या युवक काँग्रेसच्या लढ्याला अखेर यश आले आहे. व्यापारी संकुलाची दुरुस्ती, रंगरंगोटी तसेच डिजिटल फलकाच्या मागणीची ग्रामपंचायत मुंजवडीने दखल घेत सकारात्मक कार्यवाही सुरू केल्याची माहिती युवक काँग्रेस कमिटी सातारा जिल्ह्याचे सरचिटणीस गंगाराम अरुण रणदिवे यांनी दिली.
व्यापारी संकुलाच्या दुरवस्थेकडे ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष द्यावे, यासाठी रणदिवे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. १ ऑक्टोबर २०२६ अखेरपर्यंत योग्य कार्यवाही न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
दरम्यान, ग्रामपंचायत स्तरावर या मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही पूर्णत्वास आल्याने जनसामान्यांसह भीमसैनिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे १ ऑक्टोबर रोजी करण्यात येणारे उपोषण आपण मागे घेत असल्याचे रणदिवे यांनी जाहीर केले.
या लढ्याला साथ दिल्याबद्दल त्यांनी सर्व पत्रकार बांधव, काँग्रेस कमिटी फलटण, ग्रामपंचायत मुंजवडी, गटविकास अधिकारी तसेच तहसीलदार यांचे मनःपूर्वक आभार मानले.