(जावली /अजिंक्य आढाव )जावली, ता. फलटण : जगाचे मालक म्हणून श्रद्धेने पूजले जाणारे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या मेंढरांचे जावली येथील पोकळे वाड्यात आगमन झाल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. बाळूमामांच्या मेंढरांचे दर्शन घेण्यासाठी भाविक व ग्रामस्थांची मोठी गर्दी होत असून, पोकळे वाडा येथे सध्या श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे.
बाळूमामांच्या भक्तीपरंपरेत त्यांच्या मेंढरांना विशेष श्रद्धेचे स्थान मानले जाते. विविध गावांमध्ये मेंढरांचे आगमन झाल्यानंतर भाविक मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतात. त्यानुसार जावलीतील पोकळे वाड्यात मेंढरांचे आगमन झाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दर्शनासाठी येणारे भाविक श्रद्धेने पूजा-अर्चा करीत असून, परिसरात बाळूमामांच्या नामस्मरणाने भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे.
या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत पोकळे वाडा, जावली येथे ह.भ.प. विकास महाराज देवडे यांच्या विशेष कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
विकास महाराज देवडे यांच्या रसाळ व ओघवत्या वाणीतील कीर्तनातून श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या जीवनकार्याचा, भक्तीमार्गाचा आणि त्यांच्या विचारांचा जागर करण्यात येणार आहे. त्यामुळे या कीर्तन सोहळ्याची भाविकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.
या भक्तिमय सोहळ्यास जावली तसेच परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या मेंढरांचे दर्शन आणि विकास महाराज देवडे यांच्या कीर्तनाचा आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
बाळूमामांच्या मेंढरांचे आगमन, भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी आणि त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेले कीर्तन यामुळे पोकळे वाडा भक्तीच्या रंगात रंगून गेला असून, जावली परिसरात बाळूमामांच्या नामघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच समस्त पोकळे परिवाराकडून उपस्थित भाविकांना महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.