मुंजवडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलाची दुरवस्था ; ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह..? ; सरचिटणीस युवक काँग्रेस कमिटी सातारा – गंगाराम रणदिवे यांचा दि. 1 ऑक्टोबर रोजी उपोषणाचा इशारा
(जावली /अजिंक्य आढाव ): मुंजवडी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुला’ची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, या व्यापारी संकुलाची तातडीने दुरुस्ती व रंगरंगोटी करून डिजिटल फलक बसवावा, अशी मागणी सरचिटणीस युवक काँग्रेस कमिटी सातारा – गंगाराम अरुण रणदिवे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी फलटण पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी किरण मोरे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
निवेदनानुसार, मुंजवडी गावच्या व्यापाराचे उगमस्थान असलेल्या या व्यापारी संकुलातील एका गाळ्याच्या पत्र्याचे छत पूर्णपणे गंजले असून, अनेक ठिकाणी त्याचे तुकडे झाले आहेत. त्यामुळे व्यापारी संकुलाची सुरक्षितता आणि देखभाल याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या व्यापारी संकुलाचे ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल, मुंजवडी, ता. फलटण’ असे नामकरण करण्यात आले आहे. मात्र, संकुलाची झालेली दुरवस्था पाहता त्याची तातडीने दुरुस्ती, रंगरंगोटी तसेच संकुलाच्या नावाचा डिजिटल फलक बसविण्याची मागणी रणदिवे यांनी केली आहे.
रणदिवे यांनी सांगितले की, या विषयाबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे यापूर्वीही पाठपुरावा करण्यात आला आहे. दि. २५ फेब्रुवारी २०२३ रोजी ग्रामसेवकांशी पत्रव्यवहार करूनही अद्याप व्यापारी संकुलाचा नामफलक बसविण्यात आलेला नाही, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. ग्रामसेवक व ग्रामसभेतही या विषयाकडे लक्ष वेधण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
ग्रामपंचायतीने व्यापारी संकुलाच्या दुरवस्थेकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक दुरुस्तीची कामे करावीत, तसेच संकुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असलेला डिजिटल फलक बसवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही न झाल्यास दि. 1ऑक्टोबर 2026 पासून व्यापारी संकुलासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा गंगाराम रणदिवे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे मुंजवडी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.