(जावली /अजिंक्य आढाव ): आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावली गावातील राजकीय वातावरण तापू लागले असून, सरपंचपदासाठी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. माजी उपसरपंच बाळासाहेब पोकळे यांनी थेट सरपंचपदासाठी आपण इच्छुक असल्याचे जाहीर केल्याने जावलीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.
बाळासाहेब पोकळे यांचा ग्रामपंचायत राजकारणातील प्रदीर्घ अनुभव असून, सन १९९५ ते २०२१ या कालावधीत त्यांनी राजे गटाकडून सरपंच म्हणून कामकाज पाहिले आहे. त्यानंतर सन २०१३-१४ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाकडून सदस्य म्हणून जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. त्यामुळे गावच्या राजकारणाची तसेच ग्रामपंचायतीच्या कामकाजाची त्यांना प्रदीर्घ जाण आहे.
याच अनुभवाच्या जोरावर यावेळी थेट जनतेतून होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीत उतरण्याची तयारी पोकळे यांनी दर्शविली आहे. “पक्षाने पुन्हा संधी दिल्यास आपण थेट सरपंचपदासाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहोत,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.
चार राजकीय शक्ती आमनेसामने..?
दरम्यान, जावलीत यंदाची ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय समाज पक्ष (रासप), राजे गट (शिवसेना एकनाथ शिंदे गट), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, भाजप तसेच जावल सिद्धनाथ ग्रामविकास आघाडी यांच्या माध्यमातून स्वतंत्र राजकीय ताकद उभी राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
एकीकडे अनुभवी उमेदवार म्हणून बाळासाहेब पोकळे यांचे नाव चर्चेत आले असताना दुसरीकडे विविध राजकीय गटांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काळात कोणता गट कोणासोबत जाणार आणि कोणता चेहरा सरपंचपदासाठी मैदानात उतरणार, याबाबत ग्रामस्थांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
जावलीत समीकरणे बदलणार..?
सरपंचपदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने प्रत्येक राजकीय गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरण्याची शक्यता आहे. पारंपरिक गटबाजी, नव्या राजकीय आघाड्या आणि इच्छुक उमेदवारांची वाढती संख्या यामुळे जावलीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
बाळासाहेब पोकळे यांची दावेदारी, विविध पक्षांची मोर्चेबांधणी आणि जावली सिद्धनाथ ग्रामविकास आघाडीची भूमिका यामुळे जावलीच्या सरपंचपदाची निवडणूक कोणाच्या पारड्यात झुकणार, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
आगामी काळात उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर जावलीतील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार असून, “सरपंच कोण?” याची चर्चा मात्र आतापासूनच गावच्या चौकाचौकात रंगू लागली आहे.