(जावली/ अजिंक्य आढाव ): फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “स्पर्धा परीक्षांमधून पोलीस अधिकारी होण्याचा प्रवास : नियोजन, तयारी आणि यश” या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा, प्रेरणा आणि यशाचा मार्ग मिळावा या उद्देशाने आयोजित कार्यक्रमाला विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. एच. कदम होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस उपअधीक्षक तथा सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप गोरड उपस्थित होते. तसेच IQAC समन्वयक प्रा. डॉ. टी. पी. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत मालोजीराजे व प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. गिरीष पवार यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केल्यास यशाचा मार्ग अधिक सुकर होतो, असे सांगत केंद्राच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच प्रमुख पाहुण्यांच्या यशस्वी प्रवासाची माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली.
प्रमुख मार्गदर्शक प्रदीप गोरड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना स्पर्धा परीक्षांमधील यशासाठी नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे व्यवस्थापन, शिस्त, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम यांचे महत्त्व अधोरेखित केले. अधिकारी होण्याच्या प्रवासातील स्वतःचे अनुभव सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करण्याचा संदेश दिला.
“यशस्वी व्हायचे असेल तर ध्येयाशी निष्ठा, त्याग, सातत्य आणि कठोर परिश्रम यांना पर्याय नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, त्यातून शिकत पुढे जाणे हेच खरे यशाचे गमक आहे,” असे प्रेरणादायी विचार त्यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयीन जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करण्याचे महत्त्व सांगताना त्यांनी नियमित वर्तमानपत्र वाचन, संदर्भग्रंथांचा अभ्यास, चालू घडामोडींचे ज्ञान, उत्तरलेखनाचा सराव, व्यक्तिमत्त्व विकास आणि मुलाखतीची तयारी यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पोलीस सेवा आणि प्रशासकीय सेवांमधील करिअरच्या विविध संधींचीही माहिती विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी कु. प्राजक्ता लक्ष्मण शिंदे (महसूल सहाय्यक) यांनी मनोगत व्यक्त करत प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, असा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला.
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. पी. एच. कदम यांनी विद्यार्थ्यांनी स्पष्ट ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. स्पर्धा परीक्षा ही केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून समाजसेवा आणि नेतृत्व घडविण्याची मोठी संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. महाविद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा उपक्रमांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
प्रा. डॉ. टी. पी. शिंदे यांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महाविद्यालयात उपलब्ध सुविधा, अभ्यासाचे नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमानंतर झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन, पुस्तकांची निवड, वेळेचे व्यवस्थापन, शारीरिक चाचणी, मुलाखत आणि करिअरच्या विविध संधींबाबत प्रश्न विचारले. प्रमुख पाहुणे प्रदीप गोरड यांनी सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देत विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पायल जाधव व कु. शिवांजली रणदिवे यांनी केले, तर कु. श्रुतिका कदम हिने आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विविध शाखांतील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात नावनोंदणी करण्याची उत्सुकता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा देणारा हा प्रेरणादायी उपक्रम ठरल्याबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात आले.