(फलटण/ प्रतिनिधी ): फलटण नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ८ मध्ये लावण्यात आलेल्या कथित अनधिकृत फ्लेक्स बोर्डांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी शिवसेना म्युनिसिपल पार्टीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, नगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावण्यास निर्बंध घातलेले असतानाही काही ठिकाणी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता फ्लेक्स बोर्ड उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे हे कथित अनधिकृत फ्लेक्स बोर्ड पुढील दोन दिवसांच्या आत हटविण्यात यावेत, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या अनधिकृत फ्लेक्सना कोणत्याही परिस्थितीत परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत नगर परिषद प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास, निवेदनावर स्वाक्षरी केलेले नगरसेवक फलटण नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसतील, असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर विशाल उदय तेली, पांडुरंग मानासिंगराव गुंजवटे, अजनारुद्दीन ताजुद्दीन शेख, रुपाली सुरज जाधव, पंकज चंद्रकांत पवार, सिमता संगम शहा, विकास वसंतराव काकडे, आणि कविता श्रीराम मदने, श्वेता किशोर तारळेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.