(फलटण | प्रतिनिधी) :फलटण शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने खंडणीच्या गुन्ह्यातील दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला शिताफीने ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास फलटण येथील एका हेअर कटिंग सलूनमध्ये दोन जण घुसले. त्यापैकी एका आरोपीने धारदार लोखंडी हत्यार बाहेर काढून दुकानदाराला धमकावत, “मला आणि माझ्या भावाला ओळखत नाहीस का? दुकान चालू केले आहे, तुला खल्लास करीन,” अशी धमकी दिली. तसेच १० हजार रुपयांची खंडणी मागून दुकानदार व तेथील मुलांना मारहाण केली आणि दुकानातील सामानाची तोडफोड केली.
या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील एक आरोपी अभिजित अरुण जाधव (रा. मलठण, ता. फलटण) याला यापूर्वी अटक करण्यात आली होती. मात्र दुसरा आरोपी दोन महिन्यांपासून फरार होता.
फरार आरोपीचा सातत्याने शोध घेत असताना डी.बी. पथकाने अक्षय संजय जाधव (रा. मलठण, ता. फलटण) याला शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सातारा, अपर पोलीस अधीक्षक सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. धनश्याम बळवळ यांच्या नेतृत्वाखालील डी.बी. पथकाने केली. या पथकात पोलीस हवालदार संतोष नाळे, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र टिके व अतुल बडे यांनी सहभाग घेतला.