(पुणे/ प्रतिनिधी ) -उरवडे (ता. मुळशी, जि. पुणे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुतारवाडी (केंद्र उरवडे) येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधत विद्यार्थ्यांच्या सहभागातून पारंपरिक पालखी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. वारकरी परंपरेचे संस्कार, भारतीय संस्कृतीची ओळख आणि भक्तीभाव विद्यार्थ्यांमध्ये रुजावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शाळेच्या परिसरात सकाळपासूनच भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून हातात टाळ, मृदंग आणि वीणा घेत “ज्ञानोबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी विठ्ठल” अशा जयघोषात पालखी सोहळा काढला. अभंग, भजन आणि नामस्मरणाच्या सुरावटींनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
पालखी मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या विचारांचे महत्त्व, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख तर झालीच, शिवाय सामूहिकता, शिस्त, भक्ती आणि सामाजिक एकात्मतेचे मूल्यही अनुभवता आले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती खोपडे-ओहळे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि शिक्षकांच्या सहकार्यामुळे पालखी सोहळा अत्यंत आनंददायी व संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी विठ्ठल नामाचा गजर करत समाजात सद्भावना, संस्कार आणि भारतीय परंपरांचे जतन करण्याचा संदेश दिला. शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांनीही कौतुक करत विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्ये रुजविण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.