(फलटण/ प्रतिनिधी)साखरवाडी (ता. फलटण) येथून शनिवारी घरातून बेपत्ता झालेला १४ वर्षीय संकल्प संदीप रूपनवर हा पंढरपूर येथे सुखरूप अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे रूपनवर कुटुंबीयांसह संपूर्ण साखरवाडी परिसरात सुटकेचा निश्वास टाकण्यात आला. या शोधमोहीमेत पोलिस प्रशासन, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळे संकल्प सुखरूप घरी परतला.
मिळालेल्या माहितीनुसार, घरातून निघून गेलेल्या संकल्पचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी सर्वत्र शोधमोहीम सुरू केली होती. याबाबतची माहिती सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आली होती. पोलिस प्रशासनानेही तातडीने शोधकार्य सुरू केले होते.
दरम्यान, पंढरपूर येथे संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या संकल्पकडे एसटी चालक नितीन मारुती पवार (रा. मोगराळे) आणि वाहक नारायण रामचंद्र मांढरे (रा. बाबधन) यांचे लक्ष गेले. त्यांनी प्रसंगावधान राखत मुलाशी संवाद साधला आणि त्याची माहिती पडताळून सुरक्षित ताब्यात घेतले.
यानंतर संकल्पला नातेपुते बसस्थानक येथे आणण्यात आले. संबंधित कुटुंबीयांशी संपर्क साधून त्याला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. चालक आणि वाहक यांनी दाखविलेली सतर्कता, संवेदनशीलता आणि कर्तव्यनिष्ठेमुळे एका कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या संपूर्ण शोधमोहीमेत विक्रम आप्पा भोसले, पोलिस प्रशासन, विविध प्रशासकीय अधिकारी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्वांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे संकल्प सुखरूप कुटुंबात परतल्याबद्दल रूपनवर कुटुंबीयांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
संकल्प सापडल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात एसटी चालक नितीन मारुती पवार आणि वाहक नारायण रामचंद्र मांढरे यांचा विक्रम आप्पा भोसले यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या माणुसकीपूर्ण सेवाभावाचे आणि कर्तव्यदक्षतेचे मनापासून कौतुक केले.
यावेळी रूपनवर कुटुंबीयांनी या प्रसंगी सहकार्य करणाऱ्या पोलिस प्रशासन, सर्व ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते तसेच मदतीचा हात पुढे करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे ऋण व्यक्त करत, “वेळीच मिळालेल्या सहकार्यामुळे आमचा मुलगा सुखरूप परत आला,” अशी भावना व्यक्त केली. चालक आणि वाहक यांच्या जागरूकतेमुळे एका कुटुंबाचा आनंद परत मिळाल्याने त्यांच्या कार्याची परिसरात सर्वत्र प्रशंसा होत आहे.