आपला जिल्हा

ज्ञान, समता आणि न्यायाचा संदेश ; मुधोजी महाविद्यालयात आंबेडकर जयंती उत्साहात साजरी..!

(फलटण /प्रतिनिधी )– फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पंढरीनाथ कदम व मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रा. फिरोज शेख यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ व राज्यघटनाकार होते. त्यांच्या संविधानात्मक कार्याचा आदर्श अनेक देशांनी घेतला असून, कोलंबिया विद्यापीठात त्यांच्या संशोधनाच्या मानार्थ त्यांची प्रतिमा अभिमानाने प्रदर्शित करण्यात आली आहे. त्यांच्या मानवमुक्तीच्या विचारांमुळे जगभरातील वंचित समाजांना प्रेरणा मिळाली आहे.

ज्येष्ठ पत्रकार मुकुटराव कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, डॉ. आंबेडकर यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. तसेच हिंदू कोड बिलाद्वारे स्त्रियांना समान हक्क देण्याचे क्रांतिकारी कार्य त्यांनी केले. आजच्या काळात त्यांच्या विचारांचा आदर्श घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत शेट्ये यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!