आपला जिल्हा
सार्वजनिक बांधकाम उपविभाग जि.प.फलटण कार्यालयातील लिपिकाचे कारनामे

(फलटण/ प्रतिनिधी) – सार्वजनिक बांधकाम जि.प.फलटण उपविभाग या कार्यालयातील लिपिक हा जाणीवपूर्वक कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येकालाच अडवणूक करून त्रास देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
या कार्यालयात बांधकामाशी संबंधित अनेक सामान्य लोक तसेच ठेकेदार आपल्या विविध कामासाठी या कार्यालयामध्ये येत असतात मात्र आलेले अनेक ठेकेदार असतील किंवा सामान्य नागरिक यांच्या कामाला जाणीवपूर्वक विलंब लावण्याचे काम हा माजोर लिपिक करीत आहे.
बारनिशी विभागामध्ये कोणत्याही पत्राचे अथवा बिलाचे साधे आवक-जावक करावयाचे असेल तरी त्यासाठी कोण मलिदा देत आहे का याची वाट पाहतो. नाहितर आवक-जावक करण्यासाठी संबंधितांना ताटकळत ठेवत असतो. वरिष्ठ अधिकारी वर्गाने बोलावले आहे असे सांगून त्यांच्या नावाखाली टेबल सोडून सारखा बाहेर जात असतो.
ठेकेदारांची बिले काढण्यासाठी अवास्तव रकमेची मागणी ही या लिपिकाकडून वारंवार होत असते.संबंधित लिपिकाला कार्यालयातील अनेक जण पाठीशी घालत असल्याचे दिसून येत असून अशा माजोर लिपिकावर संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता कारवाई करणार की, नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
टिप- सविस्तर कारनामे पुढील अंकात



