आगार व्यवस्थापकांचे लेखी आश्वासन; दोन ते तीन दिवसांत बस सुरू, शनिवार-रविवारही सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय!
(जावली | प्रतिनिधी)आंदरुड येथील मुक्कामी एस.टी. बससेवा वारंवार बंद राहत असल्याने विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या प्रश्नावर आंदरुडकरांनी एकजूट दाखवत फलटण एस.टी. आगारात केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. आंदरुड मुक्कामी एस.टी. बस दोन ते तीन दिवसांत सुरू करण्यात येईल, तसेच शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही बससेवा सुरू ठेवण्यात येईल, असे लेखी आश्वासन आगार व्यवस्थापकांनी दिले आहे.
आंदरुड येथील एस.टी. बससेवा वारंवार बंद होत असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल होत होते. विशेषतः दिवाळी आणि भाऊबीज यांसारख्या सणांच्या काळात बाहेरगावी असलेल्या नागरिकांना गावाकडे ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रवासावरही याचा परिणाम होत होता.
या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी फलटण एस.टी. महामंडळाच्या आगार व्यवस्थापकांना लेखी निवेदन देण्यात आले होते. बससेवा पूर्ववत सुरू न केल्यास दि. ११ नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
मात्र, निवेदन देऊनही बससेवा सुरू न झाल्याने बुधवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी ऐन भाऊबीजेच्या दिवशी फलटण एस.टी. आगारात प्रत्यक्ष आंदोलन करण्यात आले. ग्रामीण भागातील जनतेच्या मूलभूत प्रवासी सुविधेसाठी सणाच्या दिवशीही आंदोलन करण्याची वेळ आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली.
आंदोलनाची गंभीर दखल घेत आगार व्यवस्थापकांनी आंदरुड मुक्कामी बससेवा दोन ते तीन दिवसांत सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येईल, तसेच शनिवार व रविवार या शाळेच्या सुट्टीच्या दिवशीही बससेवा बंद न ठेवता नियमित सुरू ठेवण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
या आंदोलनावेळी ज्येष्ठ नेते पै. बजरंग नाना गावडे, नितीन गोडसे पाटील, आंदरुड गावचे ज्येष्ठ सहकारी बाळास कर्णे, ज्योतीराम कर्णे, गणेश पाटील, अरुण जाधव, प्रकाश चव्हाण, भानुदास अडगळे, नितीन पवार, शंभूराज जाधव, शंभूराज पवार, रोहन पाटोळे आदी उपस्थित होते.
आश्वासनाची अंमलबजावणी होईपर्यंत पाठपुरावा सुरूच!
आगार व्यवस्थापकांनी दिलेल्या लेखी आश्वासनानुसार प्रत्यक्ष बससेवा सुरू होईपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ बापूराव यजगर यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना नियमित एस.टी. सेवा मिळावी, हा या आंदोलनामागील प्रामाणिक उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.