(जावली/ अजिंक्य आढाव )राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली असून, ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी भारतीय जनता पक्षाला दिलेला राजकीय पाठिंबा मागे घेण्याची जाहीर घोषणा केली आहे. जनहिताच्या अपेक्षांची पूर्तता होत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले. यापुढे भाजपशी कोणताही राजकीय संबंध राहणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र, आपण भाजपच्या अधिकृत सभासद नसून पक्षात अधिकृत प्रवेशही केलेला नव्हता, असे ॲड. खरात यांनी स्पष्ट केले. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा, विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, महिलांची सुरक्षितता आणि सक्षमीकरणाला चालना मिळावी, तसेच युवकांच्या भविष्याला योग्य दिशा मिळावी, या अपेक्षेतून भाजपला पाठिंबा दिला होता, असे त्यांनी नमूद केले.
मात्र, सर्वसामान्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या समस्या, महिलांची सुरक्षितता, युवकांचे भविष्य आणि रोजगाराच्या संधी या महत्त्वाच्या विषयांवर अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे जनहिताला प्राधान्य देत भाजपला दिलेला पाठिंबा मागे घेण्याचा ठाम निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
‘पक्षापेक्षा जनतेचा विश्वास महत्त्वाचा’
कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा जनतेचा विश्वास, सामान्य माणसाचे प्रश्न आणि समाजहित आपल्यासाठी अधिक महत्त्वाचे असल्याचे ॲड. खरात यांनी स्पष्ट केले. आपले सामाजिक व राजकीय कार्य कोणत्याही पक्षाच्या किंवा सत्तेच्या चौकटीपुरते मर्यादित नसून, सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि लोककल्याणासाठी समर्पित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यापुढेही स्वतंत्रपणे सामाजिक व राजकीय कार्य सुरू ठेवणार असून, जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणे, अन्यायाविरुद्ध लढा देणे आणि महिला, विद्यार्थी, युवक तसेच वंचित घटकांच्या हक्कांसाठी कार्य करणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट सध्या सुरू असलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसह आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही ॲड. खरात यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपला असलेला आपला पाठिंबा संपुष्टात आला असल्याची नोंद मतदार, पदवीधर मतदार, समर्थक आणि हितचिंतकांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
मतदारांनी कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता उमेदवाराची कार्यक्षमता, प्रामाणिकपणा, जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि लोकहिताची भूमिका विचारात घेऊन आपल्या विवेकानुसार योग्य उमेदवाराला मतदान करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
‘जनसेवा हेच अंतिम ध्येय’ आपली राजकीय वाटचाल सत्तेसाठी नसून जनतेच्या हक्कांसाठी आहे. आपली बांधिलकी कोणत्याही राजकीय पक्षाशी नसून सर्वसामान्य जनता, सामाजिक न्याय आणि लोककल्याणाशी असल्याचे ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी स्पष्ट केले. जनतेचा विश्वास हीच आपली खरी ताकद असून, जनसेवेची वाटचाल यापुढेही अविरत सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.