(जावली/ अजिंक्य आढाव ):फलटण–शिखर शिंगणापूर मार्गावरील जावली येथील बागचा वडा पुलाला भगदाड पडल्याने पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना संभाव्य धोक्याचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाने या पुलाची तातडीने पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. फलटण–शिखर शिंगणापूर हा परिसरातील महत्त्वाचा मार्ग असून, या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. अशा परिस्थितीत पुलाला पडलेले भगदाड दुर्लक्षित राहिल्यास वाहनचालकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहणार का?
पुलाच्या दुरुस्तीकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. संबंधित विभागाने तातडीने पुलाची पाहणी करून भगदाडाची दुरुस्ती करावी. दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत आवश्यक असल्यास धोक्याच्या ठिकाणी सूचना फलक लावून वाहनचालकांना सतर्क करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.