(जावली /अजिंक्य आढाव ): बरड जिल्हा परिषद गटातील सध्याची दुष्काळी परिस्थिती तसेच दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली पर्यावरणाची समस्या लक्षात घेता, शासकीय विकासकामांसोबत वृक्षसंवर्धनालाही प्राधान्य देण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर बरड जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सौ. वैशाली संदिप कांबळे यांनी शासकीय विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांना पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.
बरड जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये शासनाच्या योजनांतर्गत सुरू असलेल्या विकासकामांच्या कंत्राटदारांनी सामाजिक बांधिलकी जपत संबंधित ग्रामपंचायतीला किमान १० झाडे उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन सौ. वैशाली संदिप कांबळे यांनी केले.
बरड जिल्हा परिषद गटात ‘विकासासोबत हरित विकास’चा संदेश; प्रत्येक कंत्राटदाराने ग्रामपंचायतीला किमान १० झाडे देण्याचे जिल्हा परिषद सदस्य सौ. वैशाली संदिप कांबळे यांचे आवाहन
ग्रामपंचायतींनी उपलब्ध होणाऱ्या झाडांची लागवड शाळा परिसर, ग्रामपंचायत कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यांच्या कडेला तसेच उपलब्ध मोकळ्या जागांमध्ये करावी. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे नियमित पाणी देऊन संगोपन व संरक्षण करण्याची जबाबदारीही सामूहिकपणे स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाईबरोबरच पर्यावरणीय समस्याही वाढत आहेत. त्यामुळे पाणी, पर्यावरण आणि भविष्यातील पिढ्यांचा विचार करून प्रत्येक घटकाने सामाजिक जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे. विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांनी आपल्या कामासोबत पर्यावरण संवर्धनासाठी योगदान दिल्यास संपूर्ण जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड होऊन हरित क्षेत्र वाढण्यास मदत होऊ शकते.
“विकासकामे गावाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत; मात्र विकासासोबत पर्यावरणाचे संवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक कंत्राटदाराने किमान दहा झाडे ग्रामपंचायतीला देऊन या उपक्रमाला हातभार लावावा. आज लावलेले एक झाड उद्याच्या पिढीसाठी मोठी संपत्ती ठरेल,” असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य सौ. वैशाली संदिप कांबळे यांनी केले.
या उपक्रमासाठी ग्रामपंचायती, शासकीय कंत्राटदार, नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेत ‘विकासासोबत हरित विकास’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणावी, असेही त्यांनी सांगितले.