(फलटण /प्रतिनिधी ): महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यता प्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित ‘दीक्षारंभ २०२६’ हा भव्य स्वागत समारंभ उत्साही, प्रेरणादायी आणि चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीने व मार्गदर्शनाने कार्यक्रमाची रंगत वाढली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयीन समितीचे व्हाईस चेअरमन श्री. शरदराव रणवरे यांनी भूषवले. व्यासपीठावर कृषिरत्न श्री. शिवाजीराव खलाटे, उद्यान पंडित श्री. रामदास कदम, प्रगतशील शेतकरी श्री. शहाजी खांडे आणि फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांनी प्रास्ताविकातून नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत करून ‘दीक्षारंभ’ या राष्ट्रीय उपक्रमाची पार्श्वभूमी व उद्दिष्टे स्पष्ट केली. श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यानंतर उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला.
दीक्षारंभ समारंभाच्या उत्तरार्धात उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्रा. एस. पी. बनकर आणि कृषि महाविद्यालयाचे डॉ. जी. एस. धायगुडे यांनी दीक्षारंभांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा विस्तृत अहवाल सादर केला. शैक्षणिक वर्ष २०२६ मधील दोन्ही महाविद्यालयांच्या प्रवेश समितीचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा २०२६ मधील यशस्वी खेळाडू आणि ‘दीक्षारंभ’ अंतर्गत आयोजित विविध क्रीडा, सांस्कृतिक व स्पर्धात्मक उपक्रमांमध्ये अव्वल ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून आपल्या भावना मांडल्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ते म्हणाले, “दीक्षारंभ कार्यक्रमासारखे उपक्रम विद्यार्थ्यांसमोर एक नवीन शिक्षण परंपरा उभी करतात. आजच्या काळात उद्यानविद्या व कृषि शिक्षणासाठी मुलींचा वाढता ओढा ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. आधुनिक युगात शेतीचे स्वरूप बदलत असून कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘ए.आय.’ (AI) प्रणालीचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक शिक्षण न घेता उद्यानविद्या व कृषी पदवीनंतर यशस्वी कृषि उद्योजक बनण्यावर भर दिला पाहिजे.”
दोन्ही महाविद्यालयांची शैक्षणिक कामगिरी उत्तम असून विद्यार्थ्यांनी आपले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडवून महाविद्यालयाचा तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचा नावलौकिक देशपातळीवर उंचवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात श्री. शरदराव रणवरे यांनी विद्यार्थ्यांना कष्टाचे महत्त्व पटवून देत यशस्वी होण्यासाठी विविध मार्गदर्शक विचार मांडले.
कार्यक्रमास दोन्ही महाविद्यालयांतील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सृष्टी झाडोकर आणि कुमारी दीक्षा चौगुले यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन प्रा. ए. एस. रासकर यांनी केले.