(फलटण/ प्रितिनिधी) : सीमेवर कर्तव्य बजावत असताना निधन झालेल्या फलटण तालुक्यातील जवान अजित बागाव यांच्या अंत्यविधीप्रसंगी काही महत्त्वाचे शासकीय अधिकारी अनुपस्थित राहिल्याचा आरोप करत, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (DPI)च्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे १ ऑक्टोबर २०२६ रोजी निवेदन सादर करण्यात आले.
DPIचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष मंगेश प्र. आवळे, जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड (रावण), फलटण तालुकाध्यक्ष निलेश चोळप आणि फलटण शहर युवक अध्यक्ष आदित्य पाटोळे यांच्या स्वाक्षरीचे हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्याची प्राप्ती नोंद करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, फलटण तालुक्यातील सुपुत्र जवान अजित बागाव यांचे कर्तव्य बजावत असताना लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीप्रसंगी फलटण तालुक्यातील काही महत्त्वाचे शासकीय अधिकारी उपस्थित नसल्याचा आरोप DPIच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
अंत्यविधीपूर्वी प्रशासनाच्या निर्देशानुसार संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या का? तसेच कर्तव्यावर असताना निधन झालेल्या जवानाच्या अंत्यविधीप्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती शासकीय नियम किंवा प्रोटोकॉलनुसार अपेक्षित होती का, याची वस्तुनिष्ठ चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
विशेषतः फलटणचे प्रांताधिकारी, फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच या प्रकरणाशी संबंधित इतर शासकीय अधिकाऱ्यांची भूमिका तपासण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सात मागण्यांद्वारे चौकशीची मागणी
DPIच्या निवेदनात प्रशासनासमोर सात प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या आहेत. संबंधित प्रांताधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व इतर शासकीय अधिकाऱ्यांकडून लेखी खुलासा घेण्यात यावा, अंत्यविधीबाबतचा शासकीय पत्रव्यवहार, सूचना व उपस्थितीची नोंद तपासावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच कर्तव्यात कसूर, नियमभंग किंवा प्रशासकीय निष्काळजीपणा आढळल्यास नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करावी. अंत्यविधीस्थळी ड्रोन किंवा इतर शासकीय चित्रीकरण झाले असल्यास त्याची अधिकृत नोंद व उपलब्ध फुटेज तपासावे, चौकशीचा अहवाल व करण्यात आलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती निवेदकांना द्यावी, तसेच भविष्यात कर्तव्यावर असताना निधन झालेल्या जवानांच्या सन्मानाबाबत अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक प्रशासकीय उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दहा दिवसांच्या आत चौकशी सुरू करून प्राथमिक कार्यवाहीची लेखी माहिती देण्यात यावी, अशी मागणीही DPIच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
जवान अजित बागाव यांच्या सन्मानाचा विषय असल्याने प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन काय कार्यवाही करते, याकडे आता फलटणकरांचे लक्ष लागले आहे.