माजी विद्यार्थ्यांकडून प्रथम वर्ष बी.एस्सी. हॉर्टिकल्चरच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शासकीय सेवा, बँकिंग, कॉर्पोरेट क्षेत्रासह उद्योजकतेच्या विविध संधींची दिली माहिती
(फलटण/ प्रतिनिधी ): श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण येथे प्रथम वर्ष बी.एस्सी. हॉर्टिकल्चरमध्ये प्रवेश घेतलेल्या नवोदित विद्यार्थ्यांसाठी ‘दीक्षारंभ २०२६’ अंतर्गत माजी विद्यार्थी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदांवर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी नवोदित विद्यार्थ्यांना उद्यानविद्या क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.
उद्यानविद्या क्षेत्र हे केवळ शेतीपुरते मर्यादित नसून शासकीय सेवा, खासगी क्षेत्र, कृषी उद्योग, विक्री व विपणन, बँकिंग, कृषी सेवा तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध असल्याचे मार्गदर्शकांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षणाच्या कालावधीपासूनच आपले ध्येय निश्चित करून वेळेचे नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एस.पी. बनकर यांनी केले. डॉ. एस.डी. निंबाळकर, प्राचार्य, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण आणि डॉ. यू.डी. चव्हाण, प्राचार्य, कृषि महाविद्यालय, फलटण यांनी माजी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
माजी विद्यार्थी सौ. सुजाता माणगावकर, लेखाधिकारी, महाराष्ट्र शासन यांनी नवोदित विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात तसेच बी.एस्सी. हॉर्टिकल्चर या अभ्यासक्रमात स्वागत केले. महाराष्ट्र शासनात लेखाधिकारी म्हणून कार्यरत असताना मातृसंस्थेने दिलेले शिक्षण व संस्कार मोठ्या प्रमाणात उपयोगी पडत असल्याचे त्यांनी सांगितले. उद्यानविद्या क्षेत्रातून कृषी अधिकारी, बँकिंग क्षेत्रातील कृषी वित्त अधिकारी (AFO) तसेच MPSCच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्याच्या संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी चार वर्षांचा कालावधी अभ्यास आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयोगात आणावा, असे आवाहनही त्यांनी केले.
श्री. विशाल इंगुलकर, शाखा व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, फलटण यांनी कृषी व हॉर्टिकल्चर पदवीधरांसाठी बँकिंग क्षेत्रातील संधींची माहिती दिली. IBPS SO अंतर्गत कृषी वित्त अधिकारी पदासाठी उपलब्ध संधी, तसेच हायटेक नर्सरी, पॉलिहाऊस, लँडस्केपिंग, कोल्ड स्टोरेज यांसारखे व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकिंग क्षेत्रातील विविध कर्ज योजनांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
श्री. वैभव पोतेकर, झोनल हेड, युनिव्हिन ॲग्री केअर प्रा. लि. यांनी ‘स्मार्ट हॉर्टिकल्चर’ आणि ‘कॉर्पोरेट ॲग्रीकल्चर’च्या वाढत्या संधींवर मार्गदर्शन केले. हॉर्टिकल्चर हा केवळ वर्गात शिकण्याचा विषय नसून प्रत्यक्ष शेतात व प्रयोगशाळेत अनुभवातून शिकण्याचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. R&D, टेक्निकल सर्व्हिसेस, ॲग्रो-मार्केटिंग, सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि हॉर्टिकल्चर कन्सल्टन्सी यांसारख्या क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
कुमारी सिद्धी भोसले, मंडल कृषी अधिकारी, महाराष्ट्र शासन यांनी कृषी विभागातील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. भाजीपाला, फळबागा आणि फुलशेती यातील बारकावे प्रत्यक्ष अनुभवातून आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले. बी.एस्सी. हॉर्टिकल्चरनंतर कृषी सेवा परीक्षेच्या माध्यमातून कृषी विभागात विविध पदांवर कार्य करण्याची संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवून शेती व मातीशी असलेली नाळ कायम ठेवावी, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एस.डी. निंबाळकर यांनी अध्यक्षीय मनोगतात नवोदित विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थ्यांचे अनुभव दिशादर्शक ठरतील, असे सांगितले. बी.एस्सी. हॉर्टिकल्चर हा केवळ पदवी मिळविण्याचा अभ्यासक्रम नसून देशाच्या कृषी व आर्थिक विकासात योगदान देण्याची संधी देणारे क्षेत्र असल्याचे त्यांनी नमूद केले. शासकीय सेवा, बँकिंग, कॉर्पोरेट क्षेत्र आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांसाठी संधी उपलब्ध असून महाविद्यालयातील प्रयोगशाळा, फळबागा व तज्ज्ञ प्राध्यापकांचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर उपयोग करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमामुळे नवोदित विद्यार्थ्यांना वरिष्ठ माजी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून विविध करिअर मार्गांची माहिती मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये करिअरविषयी सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सृष्टी झाडोकर, कुमारी धनश्री माने आणि कुमारी काजल पिसाळ यांनी केले. आभार प्रा. एन.ए. जाधव यांनी मानले. कार्यक्रमास कृषि महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी तसेच नवोदित विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.