(जावली/ अजिंक्य आढाव ): भगवान बुद्धांचा सदाचार, करुणा व नैतिकतेचा मार्ग तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समता, स्वातंत्र्य, बंधुता व सामाजिक न्यायाचे विचार केवळ ऐकण्यापुरते मर्यादित न ठेवता त्यांचे आचरण केले पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी केले.
विडणी येथील तक्षशिला बुद्ध विहारात भाद्रपद पौर्णिमेनिमित्त बुद्ध वंदना व धम्मप्रबोधन कार्यक्रम झाला. बुद्ध धम्म वर्षावास व वर्षावास सुसंस्कार पर्वानिमित्त आयोजित कार्यक्रमात घोरपडे बोलत होते.
बुद्धांनी सांगितलेल्या अहिंसा, सत्य, अस्तेय आणि नैतिक आचरणाच्या तत्त्वांमुळे व्यक्तीचे जीवन सुसंस्कृत होते आणि समाजात शांतता, सुरक्षितता व परस्पर विश्वास निर्माण होतो. वाढत्या हिंसा, चोरी व अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर सदाचाराचा मार्ग स्वीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
भाद्रपद पौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी महाप्रजापती गौतमी, यशोधरा व पाचशे राजघराण्यातील स्त्रियांचा भिक्षुणी संघातील प्रवेश, कोसलनरेश प्रसेनजित यांना दिलेला धम्मोपदेश तसेच पारिलेय्यक वनातील हत्तीची सेवा आणि माकडाने बुद्धांना अर्पण केलेल्या मधाच्या प्रसंगाचा उल्लेख केला. मध अर्पणाच्या प्रसंगामुळे ही पौर्णिमा ‘मधु पौर्णिमा’ म्हणूनही ओळखली जाते. यातून दान, करुणा, मैत्री व सर्व जीवांप्रती सद्भावनेचा संदेश मिळतो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी संघमित्र तरुण मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या व सेवानिवृत्त तसेच नव्याने नियुक्त झालेल्या सुरेश सुदाम जगताप, विनया सचिन जगताप, अतुल राहुल मोरे, राहुल बाबुराव मोरे आणि मामू काशिनाथ जगताप यांचा कैलास जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष तथा समाजप्रबोधनकार बौद्धाचार्य महावीर भालेराव, माजी सरचिटणीस बाबासाहेब जगताप, माजी प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष बौद्धाचार्य रामचंद्र मोरे यांच्यासह बौद्ध उपासक-उपासिका व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन बाबासाहेब जगताप यांनी केले.