(जावली /अजिंक्य आढाव ): फलटण तालुक्यात दिवसेंदिवस दुष्काळाचे सावट अधिकच गडद होत असताना त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तालुक्यातील धरणे, पाझर तलाव तसेच तलावातील साचलेला गाळ काढून तो शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिवसेना फलटण तालुकाप्रमुख श्री. नानासो इवरे यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यातील विविध धरणे व तलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने जलसाठ्यांची पाणीसाठवण क्षमता कमी झाली आहे. परिणामी उपलब्ध पाणीसाठा लवकर संपुष्टात येत असून अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाची ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना फलटण तालुक्यात तातडीने राबवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
धरणे व तलावांमधील गाळ काढल्यास जलसाठ्यांची क्षमता वाढण्यास मदत होणार असून भविष्यातील पाणीटंचाईवर प्रभावीपणे मात करता येईल. तसेच तलावातील सुपीक गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकल्यास जमिनीची सुपीकता वाढून पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल. त्यामुळे जलसंधारणासोबतच शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नालाही हातभार लागणार आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही योजना फलटण तालुक्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या मागणीकडे विशेष लक्ष देऊन संबंधित प्रशासकीय विभागांना तातडीने कार्यवाहीचे आदेश द्यावेत, अशी विनंती नानसो इवरे यांनी केली.
दरम्यान, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या मागणीची दखल घेतली असून तालुक्याच्या हिताच्या दृष्टीने या विषयावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच संबंधित विभागाला आवश्यक निर्देश व आदेश दिले जातील, असे आश्वासन दिल्याचे नानासो इवरे यांनी सांगितले.