(फलटण/ प्रतिनिधी) : मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त २४ सप्टेंबर २०२६ रोजी विविध उपक्रम उत्साहात पार पडले. यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना ध्वजारोहण, स्वयंसेवकांसोबत युवा संवाद तसेच ‘सेवेतून शिक्षण : चारित्र्य निर्माण आणि नेतृत्व गुण’ या विषयावरील व्याख्यानाचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता राष्ट्रीय सेवा योजना विभागासमोर प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यावेळी आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. टी. पी. शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. फिरोज शेख, डॉ. प्रशांत शेट्ये, डॉ. वैशाली कांबळे तसेच समिती सदस्य व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर स्वयंसेवकांसोबत युवा संवाद कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग (VBYLD) २०२७’ Quiz संदर्भात स्वयंसेवकांना माहिती देण्यात आली. विकसित भारताच्या संकल्पनेत युवकांचा सहभाग, नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत शेट्ये यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. मिलिंद शिंदे यांनी ‘सेवेतून शिक्षण : चारित्र्य निर्माण आणि नेतृत्व गुण’ या विषयावर मार्गदर्शन केले. सेवाकार्यातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण मिळते. समाजातील विविध घटकांशी संवाद साधताना नेतृत्व, संघभावना, निर्णयक्षमता, शिस्त आणि सामाजिक संवेदनशीलता हे गुण विकसित होतात. राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभाग विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा देणारा ठरतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी शिक्षणाचा उद्देश केवळ ज्ञानप्राप्ती नसून विद्यार्थ्यांना जबाबदार, संवेदनशील आणि सामाजिक भान असलेले नागरिक घडविणे हा असल्याचे सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजाशी जोडले जाण्याची आणि प्रत्यक्ष सेवाकार्यातून नेतृत्वगुण विकसित करण्याची संधी मिळते. स्वयंसेवकांनी सेवाभावाची मूल्ये दैनंदिन जीवनातही जपावीत, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ललित वेळेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. फिरोज शेख यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्व विकासाचा संदेश देण्यात आला.