रॉयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज जावली हॉलीबॉल संघांचे तालुकास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश : तीन गटांत प्रथम क्रमांक ; 3 संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
(जावली/ अजिंक्य आढाव )-दालवडी ता. फलटण येथे शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या शालेय तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत जावली येथील रॉयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. विविध गटांमध्ये रॉयल इंग्लिश स्कूलच्या संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत १४ वर्षे मुले, १७ वर्षे मुली आणि १९ वर्षे मुली या तीन गटांत प्रथम क्रमांक पटकावला. या तिन्ही विजयी संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१४ वर्षे मुलांच्या अंतिम सामन्यात ताथवडा विरुद्ध रॉयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जावली यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात रॉयल इंग्लिश स्कूलच्या संघाने ६ गुणांनी विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
१७ वर्षे मुलींच्या गटात तरडगाव विरुद्ध रॉयल इंग्लिश स्कूल, जावली यांच्यात अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा व रंगतदार झाला. या सामन्यात रॉयल इंग्लिश स्कूलच्या मुलींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत ५ गुणांनी विजय मिळविला.
१९ वर्षे मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात मुधोजी कॉलेज विरुद्ध रॉयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जावली यांच्यात सामना झाला. या सामन्यात रॉयल इंग्लिश स्कूलच्या संघाने ४ गुणांनी विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
याशिवाय १७ वर्षे मुलांचा संघ तरडगावविरुद्धच्या अंतिम सामन्यात उपविजेता, तर १९ वर्षे मुलांचा संघ मुधोजी हायस्कूलविरुद्धच्या सामन्यात उपविजेता ठरला. या संघांनीही आपल्या उत्कृष्ट खेळाने उपस्थितांची दाद मिळवली.
१४ वर्षे मुले, १७ वर्षे मुली आणि १९ वर्षे मुली या विजयी संघांसह संबंधित संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने रॉयल इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दशरथ चवरे, संस्थेचे सचिव श्री. अमोल चवरे सर, प्राचार्य सौ. कांचन चवरे मॅडम , तांबे सर, क्रीडा शिक्षक श्री. वाघमोडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी विजयी आणि उपविजयी संघांचे अभिनंदन केले असून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.तीन संघांची निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेचे खजिनदार बाळासाहेब गावडे फौजी आप्पा यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.