(जावली | अजिंक्य आढाव) भालवडी, ता. माण येथील जिल्हा परिषद शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रकाश दशरथ चवरे सर यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत सन २०२६ चा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. गेल्या वीस वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या चवरे सरांच्या कार्याचा या पुरस्कारामुळे गौरव झाला आहे.
प्रकाश चवरे सर यांनी गेल्या दोन दशकांपासून माळशिरस व माण तालुक्यात उपशिक्षक म्हणून कार्यरत राहून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्रोत्साहन देत लांब उडी, धावणे, गोळाफेक, लंगडी आदी क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीपर्यंत उल्लेखनीय कामगिरी करावी, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देताना त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, सामाजिक जाणीव, आत्मविश्वास आणि क्रीडाभावना रुजविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत प्रगती करण्याची संधी मिळाली.
‘शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असतो’ या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत प्रकाश चवरे सर यांनी आपल्या कार्यातून शिक्षक पेशाप्रती असलेली निष्ठा जपली आहे. त्यांच्या २० वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला मिळालेली ही पुरस्काराची पावती त्यांच्या कार्याचा गौरव करणारी ठरली आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जावली ग्रामस्थांच्या वतीने प्रकाश चवरे सरांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षक, विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी तसेच भालवडी व जावली परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस सर्व स्तरांतून मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.