(जावली /अजिंक्य आढाव )ब्रिटिशांनी पुणे शहर ताब्यात घेतल्यानंतर दुसरे पेशव्यांना १८०३रोजी स्थानापन्न करून ब्रिटिशांचे हुकूमपाल्य केले. ब्रिटिश आणि पेशव्यांनी गडकोट,किल्ले जीवापाड जपणाऱ्या रामोशी-बेरड समाजाचे रोजीरोटीचे काम,हक्क व अधिकार काढून घेऊन त्यांना वाऱ्यावर सोडले.
यावेळी या अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या नरवीर उमाजी राजे नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श व प्रेरणा घेऊन शिव राजनीती युद्धनीती व गनिमी काव्याचा अवलंब करून 14 वर्षे ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले व स्वराज्य स्थापनेला नव्याने चालना दिली,असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालय,फलटण येथील मराठी विभाग प्रमुख व विचारवंत प्रा.डॉ.प्रभाकर पवार यांनी पाडेगाव नेवसे वस्ती,ता.फलटण येथे केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी श्री. राजेंद्र जाधव हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य,श्री.गिरीश बनकर,एड.डॉ.अशोक शिंदे सर, श्री. अभिषेक सरगर,श्री.अमोल भंडलकर, सचिन भोसले,लोणंद पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल श्री.राहुल राऊत,पोलीस पाटील श्री. सुरज खरात इत्यादी होते. आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक तरुण मंडळ पाडेगाव, नेवसे वस्ती ता. फलटण यांनी आयोजित केलेल्या ‘नरवीर उमाजीराजे नाईक’ यांच्या जयंती समारंभात “आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजीराजे नाईक: ब्रिटिश सत्तेविरुद्ध पहिला सशस्त्र एल्गार” या विषयावर प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत असताना प्रा. डॉ.प्रभाकर पवार म्हणाले,लक्ष्मीबाई व दादाजी खोमणे यांच्या पोटी जन्म घेतलेले नरवीर उमाजी नाईक हे बलदंड,उंच पुरे, आणि विविध युद्धकलेत निपुण होते.ब्रिटिश व पेशव्यांच्या अन्यायकारक धोरणामुळे उपासमारीवर आलेल्या रामोशी-बेरड समाजाला व बहुजन समाजातील अनेक घटकांना हक्क व अधिकार परत मिळवून देऊन स्वराज्य संकल्पनेची नव्याने स्थापना करण्यासाठी हजारो रामोशी व इतर बहुजनांना बरोबर घेऊन ते ब्रिटिशांच्या विरोधात लढा देत होते.यामुळे ब्रिटिशांची खूप अडचण होत होती. उमाजीराजे ब्रिटिशांचे खजिने लुटून गोरगरीब,उपासमारीत अडकलेल्या समाजाला, स्त्रियांच्या सन्मानकारक जीवनाला आर्थिक हातभार लावत होते,त्यांचा लढा यशस्वी होत असताना ब्रिटिशांनी जाहीर केलेल्या भरघोस जमीन व रोख 10000 रकमेच्या बक्षीसाला भाळून जवळच्याच स्वकीय सहकाऱ्यांनी उमाजींचा घात केला. गुप्त माहिती दिल्यामुळे इंग्रजांनी उमाजींना बेसावध क्षणी पकडले व देशद्रोहचा खटला टाकला, त्यामुळे एका क्रांतिकारी युग लढ्याचा ३ फेब्रुवारी १८३२ रोजी फाशीच्या शिक्षेने अस्त झाला. पण उमाजींच्या ऐतिहासिक लढ्याला इतिहासात फार मोठे महत्त्व आहे.आज बहुजन समाजाने बदलत्या काळात उमाजीराजे नाईकांचा आदर्श घेऊन आजच्या देश विरोधी भ्रष्ट व विषमतावादी परिस्थितीचा नायनाट केला पाहिजे.शिक्षण ज्ञान व आधुनिक विचारांची कास धरून काळाची पावले उचलून समाज कुटुंब व राष्ट्राची प्रगती केली पाहिजे.यावेळी प्रा. डॉ.प्रभाकर यांनी सर्व महापुरुषांच्या बहुजन समाजाविषयीच्या कल्याणकारी विचार व कृतींचे संदर्भ देत आजच्या वर्तमान परिस्थितीला कसे सामोरे जायचे यावरही प्रबोधन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री.गिरीश बनकर यांनी केले.
कार्यक्रमाला कु.अनन्या जाधव,मयूर जाधव,कु.दुर्वा गार्डे व स्वराज जाधव या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला कृष्णा जाधव, गणेश जाधव,विनोद चव्हाण, विशाल चव्हाण,मनोज जाधव यांच्यासह बहुसंख्य स्त्री-पुरुष श्रोते उपस्थित होते.शेवटी श्री. राजेंद्र जाधव यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.