(जा़वली /अजिंक्य आढाव ): फलटण ग्रामीण पोलिसांच्या तपास पथकाने चोरीच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपास करून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने तसेच पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटारी हस्तगत करून संबंधित फिर्यादींच्या ताब्यात परत दिल्या. पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. फिर्यादी बाळासाहेब आबासाहेब चव्हाण, रा. साखरवाडी यांच्या घरामध्ये काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्याने प्रवेश करून सोन्याचे दागिने चोरी करून नेले होते. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा शोध घेतला. तपासादरम्यान चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर आज फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनावळ व पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार यांच्या उपस्थितीत सदर सोन्याचे दागिने फिर्यादी बाळासाहेब चव्हाण यांच्या ताब्यात परत देण्यात आले. चोरीस गेलेले सोने परत मिळाल्याने फिर्यादीने पोलिसांचे आभार मानले.
दरम्यान, दुसऱ्या चोरीच्या गुन्ह्यात फिर्यादी तुषार अभंग व संतोष जगताप, रा. विडणी यांच्या विहिरीवरील पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटारी काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेल्या होत्या. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा शोध घेऊन चोरीस गेलेल्या मोटारी जप्त केल्या.
या मोटारीही आज प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनावळ व पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार यांच्या उपस्थितीत संबंधित फिर्यादींच्या ताब्यात परत देण्यात आल्या. पोलिसांनी वेळेत तपास करून चोरीस गेलेल्या वस्तू परत मिळवून दिल्याबद्दल फिर्यादींनी पोलिस प्रशासनाचे आभार मानले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनावळ, पोलीस निरीक्षक दिपक पवार, पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, सचिन वाघे, हनुमंत दरडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.