(फलटण : प्रतिनिधी)आईची मजुरी, वडिलांचे प्रदीर्घ आजारपण आणि घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती अशा संकटांच्या वादळातही शिक्षणाची जिद्द आणि अधिकारी होण्याचे स्वप्न कायम ठेवत मारेगाव येथील हेमंत लता शंकर बुजाडे याने UPSC CAPF AC Exam 2025 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याची Assistant Commandant (Class-I Gazetted Officer) या प्रतिष्ठेच्या पदावर निवड झाली आहे. हेमंतच्या या यशामुळे मारेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. हेमंतच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याच्या वडिलांच्या हमालीच्या कामावर चालत होता. मात्र, सुमारे १३ वर्षांपूर्वी वडिलांना अर्धांगवायूचा तीव्र झटका आल्याने ते आजारी पडले. घरातील कमावता आधार बिछान्यावर खिळल्याने कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले. अनेक वर्षे वडिलांच्या आजारपणाशी झुंज देत कुटुंबाने परिस्थितीशी दोन हात केले.
या कठीण काळात हेमंतची आई लताताई बुजाडे यांनी कुटुंबाची जबाबदारी खंबीरपणे पेलली. आजारी पतीची शुश्रूषा करतानाच त्यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मजुरी केली. आजोबा आणि मावशीच्या सहकार्याने त्यांनी संसाराचा गाडा पुढे नेला. मुलाच्या शिक्षणात आर्थिक अडचण अडथळा ठरू नये, यासाठी लताताईंनी मोठा त्याग केला.
हेमंतने दहावीपर्यंतचे शिक्षण मारेगाव येथे घेतले. त्यानंतर वणी येथील SPM कॉलेजमधून बारावी, तर यवतमाळ येथील जगदंबा पॉलिटेक्निक कॉलेजमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून हेमंत पुण्यात दाखल झाला. अभ्यास आणि राहण्याचा खर्च भागवण्यासाठी त्याने जिममध्ये काम केले. UPSCच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेली महागडी पुस्तके घेण्यासाठी पैसे अपुरे पडत असल्याने पुस्तके खरेदी करण्यासाठी त्याने मजुरीचे कामही केले. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी अभ्यासाची जिद्द त्याने सोडली नाही आणि अखेर UPSC CAPF परीक्षेत यश मिळवले.
आपल्या यशाचे श्रेय आई, आजोबा आणि मावशीला देताना हेमंत भावूक झाला. “वडिलांचे आजारपण आणि कौटुंबिक गरिबीमुळे शिक्षण सुटण्याची वेळ आली होती. मात्र, आई, आजोबा आणि मावशी यांनी कष्ट करून माझ्या स्वप्नांना बळ दिले. आईचे कष्ट आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा यामुळेच मी या पदापर्यंत पोहोचू शकलो,” अशी भावना त्याने व्यक्त केली.
हमाली करणाऱ्या वडिलांचा मुलगा आणि मजुरी करणाऱ्या आईच्या कष्टातून घडलेला हेमंत आता केंद्रीय सेवेत वर्ग-१ अधिकारी म्हणून कार्यरत होण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे. त्याच्या या यशामुळे मारेगावसह संपूर्ण परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, प्रतिकूल परिस्थितीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी हेमंतची संघर्षमय यशोगाथा निश्चितच प्रेरणादायी ठरली आहे.