(जावली /अजिंक्य आढाव )फलटण तालुक्यातील जावली गावच्या गोफणे वस्ती (कातरजळी) परिसरात बिबट्याने हल्ला करून एका वासराला ठार मारल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याने दत्तू शिंदे यांचे वासरावर हल्ला करून त्याला ठार मारले. त्यानंतर तो जवळील उसाच्या शेतात जाऊन विसावल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी वन विभागाला तातडीने माहिती दिली आहे.
घटनेनंतर ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगत शेतात एकटे न जाण्याचे आवाहन केले आहे. वन विभागाने तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा करावा, बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, बिबट्या उसाच्या शेतात असल्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वन विभागाच्या सूचनांचे पालन करावे, तसेच लहान मुले व पाळीव जनावरे सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.