(फलटण/ प्रतिनिधी) :फलटण शहरातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
मंडळाचे सदस्य राहुल जगन्नाथ निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सन २०२६-२७ या वर्षासाठी मंडळाच्या अध्यक्षपदी जितेंद्र बाबुराव मठपती यांची एकमताने निवड करण्यात आली.
जितेंद्र मठपती यांच्या नावाचा प्रस्ताव मंडळाचे सदस्य निलेश खानविलकर यांनी मांडला. या प्रस्तावाला मंडळाचे माजी अध्यक्ष प्रितम उर्फ आबा बेंद्रे यांनी अनुमोदन दिले. उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने या निवडीला मंजुरी देत जितेंद्र मठपती यांचे अभिनंदन केले. मंडळाचे सदस्य राकेश तेली यांनी यावर्षी मंडळाच्या कार्यक्रमाची रूपरेषा काय राहणार आहे हे सविस्तरपणे सर्वांना सांगितले.
शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्षपद हे अत्यंत प्रतिष्ठेचे आणि जबाबदारीचे पद मानले जाते. मंडळाचा श्रीमंत रामेश्वर महागणपती हा फलटण तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून नवसाला पावणारा गणपती म्हणून त्याची सर्वदूर ओळख आहे.त्यामुळे या मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणे ही मोठी सेवा आणि भक्तीची संधी मानली जाते.
शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाला सुमारे सव्वाशे वर्षांची गौरवशाली परंपरा लाभली आहे. अनेक पिढ्यांपासून भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या श्रीमंत रामेश्वर महागणपतीच्या दर्शनासाठी गणेशोत्सव काळात हजारो भाविक फलटणसह परिसरातून येत असतात. मनोकामना पूर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी अनेक भक्त या गणरायाच्या चरणी येतात. भक्तांच्या अढळ श्रद्धेमुळे या गणपतीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष जितेंद्र मठपती यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या धार्मिक परंपरा अधिक सक्षमपणे पुढे नेण्याबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना नवी चालना मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित सदस्यांनी व्यक्त केला.
या सभेस फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक विकास राऊत, झाकीरभाई मणेर, राजेंद्र आहेरराव, बापूराव देशमुख, बापूराव आहेरराव, शिरीष माळवे, विजय पालकर, राकेश तेली, तात्या तेली, निलेश चिंचकर यांच्यासह मंडळाचे अनेक मान्यवर सदस्य उपस्थित होते.
सभेच्या शेवटी नवनिर्वाचित अध्यक्ष जितेंद्र मठपती यांनी मंडळाच्या सर्व सदस्यांचे आभार मानत श्रीमंत रामेश्वर महागणपतीची सेवा, भक्तांची श्रद्धा आणि मंडळाची गौरवशाली परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.