(जावली /अजिंक्य आढाव ):फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती तथा शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या सौ. रेशमाताई भोसले यांची शिवसेना महिला आघाडीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे फलटण तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रेशमाताई भोसले यांनी फलटण पंचायत समितीचे सभापती म्हणून काम करीत असताना सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. महिला सक्षमीकरण, सामाजिक कार्य आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या योगदानाची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात शिवसेना महिला आघाडीचे संघटन अधिक बळकट होईल आणि महिला कार्यकर्त्यांना नवे नेतृत्व मिळेल, असा विश्वास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, त्यांच्या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच शिवसैनिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.