(फलटण/ प्रतिनिधी ):फलटण नगरपरिषद हद्दीतील रेस्ट हाऊससमोरील नव्याने उभारण्यात आलेल्या पथदिव्यांचे उद्घाटन नुकतेच माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि उपनगराध्यक्षा सौ. भोसले यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कामाचा मोठ्या प्रमाणावर गाजावाजा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात हे काम निकृष्ट दर्जाचे असून नागरिकांच्या जीवाशी खेळणारे असल्याचा गंभीर आरोप फलटण शहर शिवसेनाप्रमुख निलेश तेलखडे यांनी केला आहे.
तेलखडे यांनी सांगितले की, पथदिव्यांची उभारणी झाल्यापासून सातत्याने अपघात घडत आहेत. फलटण एसटी स्थानकासमोरील एक पथदिवा एसटी बसचा किरकोळ धक्का लागल्यानंतर कोसळला होता. त्याच परिसरातील दुसऱ्या पथदिव्याला एक गाढव अडकून त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर रविवारी आठवडा बाजारादरम्यान आणखी गंभीर घटना घडली.
रविवारी भरलेल्या आठवडा बाजारात डिव्हायडरमध्ये बसलेल्या शेतकऱ्यांवर अचानक एक पथदिवा कोसळल्याने दोन शेतकरी गंभीर जखमी झाले. त्यापैकी एका महिला शेतकरीच्या मनगटाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे.
या महिलेची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने तिच्या शस्त्रक्रियेचा आणि उपचारांचा संपूर्ण खर्च फलटण शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती निलेश तेलखडे यांनी दिली.
पुढे बोलताना तेलखडे म्हणाले, “आमचा विकासकामांना कोणताही विरोध नाही. आम्हीही महायुती सरकारचा भाग आहोत. मात्र विकासाच्या नावाखाली निकृष्ट दर्जाची कामे करून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार कदापि सहन केला जाणार नाही. आम्ही आणलेल्या निधीतील विकासकामांनाही जर नगरपरिषदेतील सत्ताधारी अडथळे आणत असतील, तर तेही आम्ही सहन करणार नाही.”
या पथदिव्यांच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची चर्चा शहरात सुरू असून, नगरपरिषदेतील काही पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
“फलटण शहरात सुरू असलेला विकास हा जर टक्केवारीच्या राजकारणामुळे नागरिकांच्या जीवावर बेतत असेल, तर अशा प्रत्येक विकासकामाचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरेल. यापुढे प्रत्येक निकृष्ट कामाचे पुराव्यानिशी पोलखोल केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा इशाराही निलेश तेलखडे यांनी दिला.