(जावली /अजिंक्य आढाव ): फलटण तालुक्यातील गुणवरे येथे दुध काढण्याच्या इलेक्ट्रिक मशीनचा शॉक लागून २८ वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे गुणवरे परिसरात हळहळ व्यक्त होत असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका तानाजी कर्णे (वय २८, रा. गुणवरे, ता. फलटण) या आपल्या पती तानाजी तात्याबा कर्णे यांच्यासोबत नेहमीप्रमाणे दि. २४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास घराशेजारील गोठ्यात म्हशीचे दूध काढण्यासाठी गेल्या होत्या. दूध काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मशीनला जोडलेल्या कॅनचे झाकण काढून ते गोठ्यातील बोर्डाच्या पाटीला अडकवण्यासाठी जात असताना अचानक मशीनमध्ये विद्युत प्रवाह आल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला.
अचानक आरडाओरडा झाल्याने पती तानाजी कर्णे यांनी तत्काळ धाव घेत पत्नीला विजेच्या संपर्कातून बाजूला ओढले. त्यावेळी त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. नातेवाईकांच्या मदतीने त्यांना तातडीने खासगी वाहनातून उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्यात आली. फिर्यादी तानाजी तात्याबा कर्णे यांनी दिलेल्या खबरीनुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्र. ४४/२०२५, बीएनएसएस कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण व इतर बाबींचा तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण ग्रामीण पोलिसांनी शेतकरी व पशुपालकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. गोठ्यातील दूध काढण्याची इलेक्ट्रिक मशिन, मोटार, वायरिंग, स्विचबोर्ड, अर्थिंग तसेच इतर विद्युत उपकरणांची वेळोवेळी तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी. ओल्या हाताने किंवा ओल्या जागेत विद्युत उपकरणांचा वापर टाळावा तसेच कोणतीही तांत्रिक बिघाडाची शक्यता आढळल्यास त्वरित दुरुस्ती करून घ्यावी, जेणेकरून अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना टाळता येतील.
या घटनेमुळे गुणवरे गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.