(जावली/ अजिंक्य आढाव ): जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या मा. सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने फलटण तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. विविध सामाजिक प्रश्नांबरोबरच शिक्षण क्षेत्रातील कथित गैरप्रकार, पेपरफुटीच्या घटना आणि वाढते खाजगीकरण याविरोधात आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटी ही केवळ एक समस्या नसून संपूर्ण व्यवस्थेतील गंभीर विकृती आहे. गुणवत्तेच्या आधारे संधी मिळण्याऐवजी गैरप्रकारांना खतपाणी मिळत असल्याने सर्वसामान्य व गरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत आहे. शिक्षणासह विविध क्षेत्रांतील वाढते खाजगीकरणही अनेक सामाजिक व आर्थिक समस्यांना कारणीभूत ठरत असल्याचा आरोप करण्यात आला.
यावेळी केंद्र सरकारने पेपरफुटीच्या घटनांबाबत कठोर भूमिका घेऊन दोषींवर कारवाई करावी, तसेच शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
या आंदोलनात कालिदास चोरमले, निवृत्ती खताळ, नानासो गोवेकर, वैभवराज नरुटे, नितीन सुळ, गणेश कुंभार, विकास नाळे, सागर गावडे, मंगेश आवळे, कैलास रणदिवे, नाना हुलगे, विशाल माडकर, सोमनाथ मागाडे, सागर काकडे, गोरख सुळ, रोहन डोंबाळे, दादा सुळ, प्रसाद जाधव, निखिल कुचेकर, रामभाऊ पाटोळे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले. तसेच दिवसभरात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला.