(फलटण | प्रतिनिधी )फलटण नगर परिषदेमधील कथित मालमत्ता कर अनियमितता आणि आर्थिक अपहार प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच चौकशीवर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून मुख्याधिकारी निखिल जाधव यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, फलटण नगर परिषदेतील मालमत्ता कर वसुली संदर्भात विविध वृत्तमाध्यमांमध्ये कथित आर्थिक अनियमितता व अपहाराच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने नागरिकांमध्ये सार्वजनिक निधीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे आवश्यक असल्याचे मनसेने नमूद केले आहे.
या प्रकरणातील संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींची सखोल चौकशी करण्यात यावी. चौकशीदरम्यान मुख्याधिकारींसह संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका, कागदपत्रे, ऑनलाइन नोंदी, आर्थिक व्यवहार आणि प्रशासकीय निर्णयांची तपासणी करण्यात यावी. चौकशीत जे दोषी आढळतील, त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व संबंधित नोंदी सुरक्षित ठेवून कोणताही पुरावा नष्ट होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. चौकशी निष्पक्ष होण्यासाठी मुख्याधिकारी निखिल जाधव यांचे चौकशी पूर्ण होईपर्यंत तात्काळ निलंबन करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
याबाबत तातडीने योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी दिला आहे.